Monday, 15 October 2018

काकस्पर्श

                             दोन दिवसापूर्वी लोकसत्ता रविवार पुरवणीत ' दिसते तेच खरे असते' या मथळ्याखाली विज्ञानाधारित लेख होता. विज्ञानाची अध्यापिका असल्याने विज्ञान, 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' याच तत्वावर आधारित असते, हे मान्य करण्यास वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मग तरिही दोन दिवसांपूर्वी डोळ्यांनी जे अनुभवले त्यास विज्ञानाचा आधार कसा देवू याभोवती विचार घोळू लागले.

                 आईचे बाबा, माझे आजोबा ज्यांना आम्ही 'मावशीचे बाबाच' म्हणायचो त्यांना देवाज्ञा झाली. वय झाले होते, आजारी होते. तशा सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या, समाधानी होते , पणतू , पणती  ह्यांना डोळे भरून पाहिले होते, पत्नी आणि डॉक्टरच असलेल्या मुलीकडून अगदी उत्तम , तत्पर सेवा मिळाली होती, अशा मनुष्य म्हणून अपेक्षित असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. आता फक्त कधी बोलाविणे येते ह्याचीच वाट बघत होते. आणि हे बोलाविणे आले, घटस्थापनेच्या दिवशीच सकाळी ७.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या जाण्याचे दु:ख करावे की, भूतकाळ आठवून ...बरोबर ६ वर्षापूर्वीच याच दिवशी , याच वेळी नियतीने वेळ साधली होती आणि तेव्हा मृत्युशी झुंज देवून ते त्या आजारातून सावरले होते हे आठवावे हेच कळत नव्हते. तेव्हा जगण्याची इच्छा शक्ती होती, पण यावेळेस हा तृप्त जीव मृत्युशी भांडत बसला नाही. दरवेळेस देवीच्या दारी नतमस्तक होणारे आमचे बाबा याच दिवशी देवीपुढे लीन झाले. आणि तिनेही तृप्त होवून त्यांना या जन्मीच्या भोगातून मुक्ती दिली. बाबांना तीन मुली, मुलगा नाही, हा दिवस 'मातामह श्राद्धाचा' असतो हे कळल्यावर अजूनच प्रश्न पडले.
                   अगदी चार दिवसांपूर्वीच मी बाबांना भेटून आल्यामुळे, निवांत गप्पा मारल्यामुळे , अगदी म्हणजे अगदीच निवांत त्यांच्याजवळ बसल्यामुळे त्यांच्या जाण्यावर माझा विश्वास बसेना, आणि दुसरीकडे आपल्याला सुबुद्धी झाली आणि आपण त्यांना निवांत भेटलो याचे समाधान पण होते. यावेळेस पहिल्यांदा माणसाचे जाणे किती अनपेक्षित असते याचा जवळून अनुभव घेतला. त्यावेळेस त्यांना एकच गोष्ट सांगितली, "बाबा, मी तुमची एक गोष्ट कटाक्षाने पाळते- ऐकणाऱ्यालाच सांगायला जाते, समजूनही जे ऐकत नाही त्यांच्या नादीही लागत नाही". शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेताना प्रत्येकवेळी बाबांचीच आठवण येते. त्यांनी आमचे बालपण समृद्ध केले. अजूनही त्यांच्या कुशीत जावेसे वाटते. मध्यंतरीच्या काळात संपर्क जास्त होत नसला तरी आपल्या वर प्रेम करणारी , आपल्या वाढीत मोठे योगदान देणारी माणसे सहजासहजी दुरावत नाहीत.
                   दुसरा प्रसंग त्यांच्या सावडण्याचा.... १५ ते २० मिनिटे झाली नैवेद्य ठेवून.......... नुकताच पितृ पक्ष झालेला; त्यामुळे कावळ्याने नैवेद्य खाणे याबाबतीतील चर्चा खूपच ऐकल्या होत्या. मग हिंदू संस्कृती, परदेशातील या विधींचा अभाव, तंत्रज्ञान कोठे गेले आणि आपण काय करत आहोत या सगळ्या बाबी डोक्यात घर करतात, खरे काय ,खोटे काय, सिद्ध करण्यासाठी काय करायचे ;संस्कृत चा अभ्यास केल्यामुळे मंत्रांचे महत्त्व जाणविते आणि शास्त्र शिकल्यामुळे विज्ञानाला पुराव्याची गरज असते हेही पटते.
                  ................ नैवेद्य खायला कावळा येईना, बाबांनी सांगितले होते माझा दहावा , तेरावा काही घालू नका, काही पाळू नका, मी खूप समाधानी आहे, मग हे समाधान चालीरीती च्या वेळी का दिसेना, पुन्हा एकदा विचारांची दिशा सुन्न. जाणत्या लोकांनी घरच्या मंडळीना पुन्हा पाया पडायला सांगितले, आई, ताई, सोन्यामावशी पाया पडले, आणि मनातील किंतु घालविणारे वाक्य बोलले आणि ....एकविसाव्या शतकातील माणसापुढे पुढच्याच दुसऱ्या क्षणात कावळा दिमाखात उभा होता. इतका वेळ कोठेही न दिसणारा तो कावळा क्षणार्धात प्रकट झाला, घास खाल्ला, नैवेद्याला एक फेरी मारली आणि निघून गेला. सगळेच निशब्द फक्त रडण्याचा आवाज.....आणि माझा विचारांचा प्रवास....... "दिसते तेच खरे असते" , कोणाला काही पटवायला जावू नये, त्याला त्याच्या अनुभवातून शिकायला लावावे.....आणि आपण स्वतः अनुभवाने समृद्ध व्हावे. जगात ऊर्जा असते....जशी सकारात्मक असते तशीच नकारात्मकही ऊर्जा असते. त्या उर्जेची रूपे अनुभवायची असतात.
                 बाबा, त्यादिवशी मिठी मारू की नको या विचारात मिठी मारलीच नाही.....अजूनही शांतपणे तुमच्या जवळ बसावे वाटते. तुम्ही कधीच टेंशन घेतलेले दाखविले नाही, पण तुमच्या डोक्यात असणारी काळजी ही नक्कीच जाणविली.....Thank you, बाबा

1 comment: