Friday, 21 December 2018

गणिताच्या प्रेमात....

शाळा शाळा कशी अगदी आयुष्यभराची जणू सोबतीण झाली आहे की काय कोणास ठाऊक....पण म्हणजे अजूनही रमते मी तिथे...आणि अगदी विद्यार्थिनी प्रमाणे.... तिथे असलो की जबाबदारीची जाणीव असते पण वयाचे भान नसते... कारण सोबत निखळ मनाचे, निरागस वृत्तीचे, सहज सहभाव जपणारे आणि आपल्याशी निरपेक्ष तद्रूप होणारे छोटेसे विद्यार्थी असतात. त्यांना सांगायचे, समजवायचे, शिकवायचे, ओरडायचे, गप्पा मारायच्या, समस्या ऐकायच्या , त्यांची मस्ती, तक्रारी सहन करायची वा परतून लावायची , आणि त्यांना मोठे होण्यास मदत करत करत आपण स्वतः लहान होऊन जायचे ..... असे सगळेच कसे happening .....happening...
प्रत्येक दिवस नव्या अनुभवांचा......दिनक्रम तोच...विद्यार्थी तेच....पण दररोजचा विषय वेगळा....'आज कुछ' नया करते है' ! असे म्हणता म्हणता कोणी तरी म्हणते 'आज कुछ तुफानी करते है'! मग असे तुफानी करण्यासाठी आवड सुद्धा तेवढीच सुमार हवी....अशीच गणिताची आवड असणारी नववीची अग्रणी धनश्री 'राष्ट्रीय गणित दिवस' साजरा करूया या कल्पनेने आली ... दोन महिन्यापासून गणिताचा हा किडा तिच्या डोक्यात वळवळत होता. आणि एकदा अशा किड्याने घर केले की सगळी स्थिरता संपते. गृहीतक हाताशी घेवून जोपर्यंत साध्यापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत हा प्रेमी काही शांत झोपत नाही. कल्पना चांगली होती. गणितातील कोडी, खेळ, गमतीजमती, क्लृप्त्या यांचे प्रदर्शन भरवायचे. मी अजूनही श्रोता आणि चिकित्सा करणे याच भूमिकेत होते.
गणितावर प्रेम आहेच .....पण' विज्ञानाच्या प्रेमाचा ध्यास अधिक.....त्यामुळे शिक्षकाच्या भूमिकेत एक विचार आला अरे...उद्या हा task विद्यार्थ्यांना मिळाला तर १००-१५० विद्यार्थ्यांना याबाबतीत आपल्याला मार्गदर्शन करावे लागणार.....खरच आपण एवढे updated आहोत का? की गणितातील गंमत सांगता सांगता आपलीच गंमत होईल. शेवटी मन चिंती ते वैरी न चिंती ! असो...मोठा श्वास घेतला आणि म्हटले बघू या कसे जमते ते or कसे जमवावे लागेल ते....
वर्गावर परीक्षण होऊ लागले....आणि माझी ही लहान मुले ,ज्यांना बिचाऱ्यांना कधी काळी homework वगैरे करत नाहीत म्हणून मी ओरडले होते, त्यांनी शोधलेली कोडी, गमती, त्यांचे सादर करणे ,त्या गणितातील trick समजून घेण्यासाठी प्रयत्न करणे, आणि आपण बक्षिसास पात्र ठरण्यासाठी त्यात जीव ओतणे हे सगळेच मला अप्रूप करणारे होते. हीच का ती मुले.... ज्यांना वर्गात चाकोरीबद्ध अभ्यास करताना वैताग येतो....मिस , हे करायचे आहे का ?उद्याच homework पूर्ण हवा का? असे म्हणून रडणारी .....आणि तेच गणित, तेच आकडे या गणित दिवसाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपलेसे करून माझ्या मागे मागे लागणारी ..... अहो मिस, तुम्ही आमचे कोडे बघितलेच नाही...मिस हे कोडे आम्ही अजून अवघड केले...असे आत्मविश्वासाने सांगून दुसऱ्याची गणिताची परीक्षा घेऊन गंमत बघणारी माझी हीच मुले होती.

थोडक्यात काय, एखाद्याला नावडती असणारी भाजी जेव्हा पराठे, पाव भाजी , कटलेट अशा स्वरुपात दिली जाते तेव्हा ती मिटक्या मारत खातात...अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलणे ही खरेच काळाची गरज आहे.....

माझी मुले गणिताच्या प्रेमात अशीच पडली. त्यांची अशी मैत्री झालेली पाहून निम्मे काम झाले याचे समाधान मिळाले आणि त्यासाठी धनश्री ला खरेच thanks....छान कल्पना मांडली आणि चिकाटीने हो हो चिकाटीने ती पूर्णही केली.
गृहीतक हाताशी धरून साध्यापर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पद्धतशीर पोहोचल्याचा आनंद.
या गणिताने मला कधी भीति घातलीच नाही. त्याचे श्रेय माझ्या आईला...नक्कीच! आणि नंतर शांत अशा नलावडे मिस ना.....आईचा  एकच प्रश्न असायचा गणित चुकू कसे शकते? तेच संस्कार कानावर झाले ..गणित कधीच चुकू शकत नाही...आपण जागरूक आणि चौकस असावयास हवे. त्या गणिताशी गप्पा मारायला हव्या...बाबा रे तुझे म्हणणे नेमके काय आहे? तुझ्याकडे काय काय माहिती दिली आहे? मग माझ्याकडे काय काय संचित आहे की ज्याने मी तुला उकलून देण्यास मदत करू शकतो....ते सूत्र एकदा गवसले की साध्याचा आनंद आणि अध्याय दोन्हीही संपन्न....त्या समीकरणातील क्लिष्टता जसजशी वाढत जाईल तसतशी त्या गणिताची नशा चढत जाई....ती बैठक बनत जाई....ते प्रयत्नपूर्वक गवसणे शांती मिळवून देत असे.
गणित म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर जरा शोधत होते....
गणित म्हणजे संख्या....गणित म्हणजे क्रिया....गणित म्हणजे आकृत्या....गणित म्हणजे समस्या...गणित म्हणजे प्रमेये....गणित म्हणजे सिद्धांत....गणित म्हणजे सूत्रे....गणित म्हणजे क्लृप्त्या....गणित म्हणजे तर्क....गणित म्हणजे तार्किक विचार.....आणि गणित म्हणजे उत्तर...गणितातील पद्धतशीरपणा एकदा का या शरीरात भिनला की आयुष्यात  समस्या निराकरण सोपे जाते असे माझे वैयक्तिक मत...कारण गणित तुमच्या बुद्धीला चौकसतेची धार देत असते.श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त संपन्न होणाऱ्या या गणित दिवसाच्या सादरीकरणामुळे मी पुन्हा एकदा या आकड्यांमध्ये रमले...गणितात खूप काही योगदान वगैरे दिले आहे असे बिलकुल नाही...पण गणितावर जीवापाड नक्कीच प्रेम केले....कारण या विषयाने माझ्या बाबतीत नक्कीच योगदान दिले आहे हे मी ओळखून आहे.....आजचा हा happening दिन....गणित तुम्हारे  नाम....फिर से एक नशासा....