बाप्पा गेलास....पुन्हा एकदा भरभरून देवून गेलास!
या वेळेस मोजकाच ५ दिवसांचा तुझा मुक्काम.... दरवर्षी तुझ्यापुढे अथर्वशीर्षाचे आवर्तन करण्याचा माझा ध्यास....पण या वेळेस जबाबदाऱ्या आणि वेळ याचे नीटसे गणितच जमविता येईना! त्यामुळे हक्काच्या माणसालाच बगल दिली आणि तो हक्काचा तूच होतास! म्हणजे सगळ काही तुझाच उत्सव साजरा करण्यासाठी सूरू होते, पण या अथर्वशीर्षाच्या निमित्ताने तुझ्याजवळ जे अर्धा तासाचे शांत बसून बोलणे होत होते ते मात्र राहून गेले. याची खंत खोलवर जाणवत होती पण ती करत बसायला वेळ नव्हता.
पण बहुतेक तुला हे कळले असावे, तू असे काही अनुभव देतोस की कोणाला सांगितले तर म्हणतील आपल्याच मनाचे खेळ असतात. काहीही असो, रात्री अचानक अर्धवट झोपेत gas चालू आहे की काय अशी शंका येते आणि मी स्वयंपाक घराकडे धाव घेते, सगळे व्यवस्थितच होते हे पाहून सुखावते आणि जवळच विसावलेल्या तुला न्याहाळू लागते. मनात प्रचंड अपराधी पणाची भावना, आणि त्याच तीव्रतेने तुझ्या कारुण्यमय नजरेत रममाण होते. ती शांतता मला अजूनही जाणवत आहे.
तुझे माझ्या घरी येणे मला प्रचंड चैतन्य देते, प्रत्येक घरातील , प्रत्येक जातीतील तुझ्या सेवा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा ऐकते, त्यापैकी मी नेमके काय करायचे याचा अंदाज घेत असते, प्रत्येकाची विचार करण्याची , पुजेची रीत वेगळी आणि त्यामागील कारणेदेखील सबळ. शास्त्र काय सांगते, आमच्याकडे असेच करतात, ऋजुतावस्थेत पूजा वर्ज्य, सोवळे पाळावेच लागते, या धार्मिकतेसह आता पर्यावरण पूरक गणपती असे एक ना अनेक अटींसह तुझे येणे होते, मग मात्र मला मोठा श्वास घ्यावा लागतो.
तू माझा पाहुणा आहेस, 'अतिथी देवो भव' या तत्वाने "यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारै:" मी ,'ऐकावे जनाचे...' असे एक ना अनेक ठेवणीतील वाक्यांचा आधार घेत फक्त आणि फक्त तुझ्या चैतन्यात समरस होण्यासाठी जे जे करता येइल ते ते करत असते. एखादी उपचाराची बाब नसेल तर चालेल, पण इच्छाच नसेल तर मात्र खटकेल.
माझ्यासाठी तू चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता आहेस. अथर्वशीर्षातील प्रत्येक मंत्रोच्चार तुझ्या तेजाची प्रचीती देत असतो. ते तेज तुझ्या सहवासात अनुभवायचे असते. आपले आई वडील , मित्र हे आपल्या सगळ्यात जवळचे, पण त्यांच्याशी रुसवा धरला तर तुझ्या कुशीत येण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो रे, किती चुका, अपराध पोटात घातले असशील, किती वेळा मदतीला धावून आला असशील, प्रत्येक वेळी भरभरून दिले आहेस, तुझ्या पासून काही लपवू शकत नाही, जे काही आहे ते केवळ आणि केवळ तुलाच समर्पित!
तुझ्या मिरवणुकीतील तो ढोल, तो ताशा, तो ध्वज, तो DJ , तो नाद मला आपसूक बेफाम करतो, मग तिथे शिस्तबद्ध की बेशिस्त हातवारे असा प्रश्न उभा करून त्या वर विवेकबुद्धी वगैरे वापरून मग कृती करण्याची सवलत मला घेता येत नाही. माझ्यासाठी तो फक्त नाद असतो, संचार असतो, तो फक्त एक प्रतिसाद असतो.
समर्पित भावना असते. त्या दिवशी तुझ्या डोळ्यात मला माझ्यासाठी जे कारुण्य दिसले ती माझी प्रेरणा आहे. खूप नकारात्मक गोष्टीमधून तू मला बाहेर काढलेस, तुझ्या सेवेत कोणत्याही तांत्रिक, पारंपारिक प्रथा, यामुळे खंड पडू नये एवढीच माझी इच्छा, जेव्हा असे घडते तिथे अपराधीपणाची भावना निर्माण होते. अनेक प्रश्नाची उकल माझ्याच पातळीवर शोधत आहे, कारण तुझ्या माझ्या संवादाचे नियम हे आपणच तयार केलेले असावे.
अशीच कृपा , वात्सल्य कायमस्वरूपी रहावो हे तुला सांगण्याची गरज नाही, पुन्हा एकदा मनाची तृप्ती, समाधान शांती देवून गेलास. पुढच्या वेळेस जेव्हा येशील तेव्हा तू दिलेल्या या तेजाचे प्रकटीकरण करण्याचेच माझे प्रयत्न चालू असलेले तुला दिसतील.
तुझीच सेवा करू काय जाणे!!!


स्मिता सुंदर लिहिले आहे,बाप्पा नक्कीच खुश आणि प्रसन्नही झाला असणार.
ReplyDeleteBappa barobar che nate khup sundar vicharani samarpit kele ahe Asach Bappa tuzya sobat sadiv raho
ReplyDeleteWah khup Chan, kadachit saglancha mannat hech bhav, tu khup Chan vyakt kelas. Swatashi khup relate hotay.
ReplyDelete