Tuesday, 17 October 2023

रंगात रंगूनी आमुच्या....

 आई राधा उदे उदे....
आई आज तुझा जोगवा मागत आहे.... 
आजीकडून जोगवा कशाकशाचा असतो हे ऐकत होते. आपल्याला समृध्द करणारा हा जोगवा असावा... आज मी ही समृध्दी मागत आहे.... कशाची ? तर ज्ञानाची... का? तर सामान्य स्त्री आहे मी. एक आई आहे मी.. भावी पिढीला घडवणारी शिक्षिका आहे आणि एका अशा पिढीतील आहे की जिने तिच्या आईवडिलांनी सांगितलेल्या रूढी परंपरांना असे का विचारण्याचे so called daring नाही केले आणि त्यातून जे तिला अनुभवातून मिळत गेले, समजत गेले त्यातून ती तरत गेली so called समृध्द होत गेली; आणि आता अशा पिढीला घडवण्याचे व्रत घेतले आहे की त्या पिढीला प्रत्येक हे असे का? याला समाधानकारक उत्तर दिल्याशिवाय तिला पुढे जाता येईना...
हा नऊ दिवसांचा तुझा जागर.... स्त्री शक्तीचे तू प्रतीक.... या काळात उपवास करून, अनवाणी राहून, केवळ पाण्यावर राहून, अनेक पीठांना भेटी देवून, सामूहिक भजने म्हणून, श्री सूक्त आवर्तनं करून, रास गरबा रचून अनेकविध मार्गांनी तुझी उपासना केली जाते. तुझे हे चैतन्य या सर्वांमध्ये यावे म्हणून तुझी आळवणी केली जाते.... विद्येच्या रूपाने, लक्ष्मीच्या रूपाने, धान्याच्या रूपाने, सामर्थ्याच्या रूपाने, शक्तीच्या रुपाने, भक्तीच्या रूपाने तुझा आमच्यात वास असावा... तुझी नऊ वेगवेगळी रूपे दर्शविली जातात. वेगवेगळ्या भावनांचे, शक्तीचे, प्रतीक असलेली रूपे... आमचा नमस्कार एकाच चरणी जाणार हे बुद्धीला माहीत असले तरी तुझ्या दिव्यत्वाची प्रचिती देणारी ही रूपे मनाला साद घालत राहतात अग... 
कारण आमच्या जगण्याशी ही रूपे कधी ना कधी एकरूप होतात... आणि या स्त्री सामर्थ्याचा अभिमान उचंबळून येतो ग... तुझी पूजा अर्चा करताना, तुझ्या समोरच्या निरंजनातील तेवत असलेली वात बघत असताना हे चैतन्य आमच्यातही संक्रमित होवो अशी इच्छा प्रकट होते. निरांजन नऊ दिवसच आम्ही देवासमोर तेवत ठेवतो... पण त्यामध्ये मिळणारी चैतन्याची प्रेरणा अखंडकाळ टिकून रहावी म्हणून याचना करतो ग...
मग या उत्सवात विविध क्षेत्रातील अनेक सम्राज्ञी स्त्रियांचे पूजन, सत्कार करून तिच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करून भावी पिढीसाठी नवे आदर्श घातले जातात. बाईपण भारी देवा.... उंच माझा झोका या मथळ्याखाली होणारे तिचे सत्कार तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. तिचे प्रेम, वात्सल्य, करारीपणा, संवेदनशीलता, कर्तबगारी, याचे ठसे समाजात उमटायला सुरुवात होते. आणि तिचा उत्सव नऊ दिवसांचा न राहता अखंड काळाकडे वाटचाल करायला सुरुवात होते. 
ज्यांनी स्वतः ला वेगवेगळ्या क्षेत्रात सिद्ध केले आहे त्यांचा सत्कार होतो अग... तिला काम करण्याची अजून उर्मी येते. पण प्रश्न उरतो तो सामान्य स्त्रीचा... स्वतः ला सिध्द करता येऊ शकते किंबहुना स्वतः चे अस्तित्व स्वतः च्याच डोळ्यात अभिमानाने बघण्याची ताकद येण्यासाठी जिला काही अवधी लागतो... त्या स्त्रीचा... ती काही रूढी परंपरांच्या विचारात असते, कदाचित काही पाश तिनेच निर्माण केलेले असतात, त्यानेच ती त्रस्त असते. आणि घर आवरता आवरता स्वतः च्या बुद्धीची आणि मनाची खोली आवरायची असते हेच ती विसरून जाते किंवा थोडी मागे पडते. 
ती इतकी सुंदर आहे ना...कधी कधी त्याचा विसरच तिला पडतो. हे सौंदर्य केवळ रूपाचे नसते याचीही तिला जाणीव करून द्यावी लागते. म्हणून तुझी ही नऊ रूपे. या नऊ दिवसांचा जागर करत असताना तिला तुझ्याशी connect होण्याची संधी कोणाच्या तरी भन्नाट कल्पनेतून निघालेली दिसली. एक वर्ष सगळे रस्ते, मंदिरे, कामाच्या जागा एकाच रंगाने दिसायला लागल्या. कोणीही एकत्र येऊन मास्टर प्लॅन न करता... WHATSPP... तंत्रज्ञान... तिथे स्त्रीचे कपड्यांचे, रंगांचे प्रेम लक्षात आले. देवीला ज्या रंगांचे वस्त्र तिची पूजा झाल्यावर नेसवले जाते त्याच रंगांचे वस्त्र या दिवसात लेवून आजूबाजूला वावरणाऱ्या नारी शक्तीचे अस्तित्व लक्षात येवू लागले. मंदिरात जिची आराधना करतो ती घरातही आहे... कामाच्या ठिकाणीही आहे आणि त्याच चैतन्याने कार्यरत आहे. आपल्याकडे रंगांचे वेगवेगळे महत्त्व सांगितले जाते. पांढरा शांत, लाल प्रेम, केशरी तेजस्वी, निळा स्थिरता, पिवळा आनंद, जांभळा नवनिर्मिती, हिरवा समृध्दी... ज्ञानाच्या विस्फोटाच्या दुनियेत अनेक ठिकाणाहून ही माहिती येत जाते... त्याच्या खरे खोटेपणा मध्ये सामान्य स्त्री नाही अग अडकत... तिला ते करून आनंद वाटतो ना, सहजता येते ना, आपणही इथे आहोत हे स्वतः ला सांगता येते ना एवढे तिच्यासाठी पुरेसे असते... लाल रंगाची साडी दुकानात घ्यायला गेली तर  त्या रंगाची पाहिजे ती छटा मिळेपर्यंत दुकानदाराला जेरीस आणणारी ती नवरात्राच्या त्या एका दिवशी लाल रंगांची वेगवेगळी रूपे बघून हरखून जाते.. काही जणासाठी हे fashion असेल, काही जणांसाठी सेल्फी स्टेटस असेल तर काही जणांसाठी ते रिकाम्या वेळेचे उद्योग असतील. पण कंपन्यांमध्ये, संस्थेमध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या स्त्रिया एकमेकींना दाद देखील देवू लागल्या... घरातच राहणारी स्त्री काही निमित्ताने का होईना बाहेर पडली... समोरची स्त्री ही सुद्धा आपल्याच सारखी की याची पुसटशी का होईना जाणीव येऊ लागली. तिच्या भावनांचे तरंग ही माझ्याच सारखे की... याची जाणीव होण्यासाठी ही छोटी सामूहिक कृती काम करू लागली... देऊळ नावाचा एक सुंदर चित्रपट होता. एका देवळाभोवती किती व्यक्ती connect होतात असा काहीसा अर्थ प्रतीत करणारा एक चित्रपट... जीवो जीवस्य जीवनम! 
त्यामुळे एका रंगाचे कपडे परिधान करून हा उत्सव करणे हा नियम नक्की होवू नये आणि हे करूच नये असेही होवू नये ना...   तर हे मी का करत आहे? याचा विचार करायचा असतो या साठी या सामान्य स्त्रीला घडवणे आवश्यक आहे. नाहीतर ती फक्त तंत्रज्ञानाच्या प्रवाहात वाहणारी, स्वत:चेही मत असते हे विसरणारी असेल. पुढील पिढीला या सामूहिक कृतीतून काय साध्य झाले हे सांगताही येण्यासाठी या स्त्रीला डोळस करणे आवश्यक आहे. 
 तिला आठवण करून द्यावी लागते... अग जिची तू एवढ्या भक्ती भावाने उपासना करत आहेस तिचा अंश तुझ्यात आहे. पुढच्या पिढीला जे संस्कार देत आहेस त्या संस्कारात नरनारीचा यथोचित आदर करायचा असतो हा संस्कार आवर्जून दे आणि त्यासाठी तुला जे कर्म करावे लागेल ते पूर्ण विचारपूर्वक कर.... तुझ्या या कर्मांना कोणी कांड म्हणता कामा नये एवढी ताकद तुझ्या सदसद्विवेकबुद्धीमध्ये आण. कारण तू निर्माती आहेस...
 आई...'म्हणजे मी नेमके काय करू?' हा प्रश्न पडणाऱ्या अनेक सामान्य स्त्रिया या समाजात आहेत. त्यांना एकत्र कसे आणायचे? तुझा खरा जागर त्या एकमुखाने स्त्री शक्ती वाढविण्यासाठी कशा करतील? काही
बायका बायकांचे आपापसात पटत नाही. तो एक स्त्री जातीला लाभलेला शाप आहे... त्याचे काय करायचे? आता त्याची तीव्रता एवढी नसेल पण स्त्री धर्मातच धुसफूस चालूच असलेली दिसते की... कोणतीही सामूहिक  कृती करायची म्हटली की यांच्या शंभर दिशांना कल्पना... कोठे आणि कसे एकमत आणायचे? तिच्यामध्ये भावनांचे अनेक रंग आहेत पण ते त्या एकरूप होवून कधी भिजणार? स्त्रीत्वाची संवेदनशील वृत्ती आणि पुरुषार्थचा कणखर बाणा याचे आदर्श उदाहरण ती स्वतः मधून कधी घालून देणार? तिचे अस्तित्व दाखवणारी ३३% आरक्षण तिला आज लाभले पण ती त्याची सवय करून घेणार की आता त्याची गरज नाही असे ठणकावून सांगणारी स्वयंसिद्धा होणार? स्वतः ची दोरी इतरांच्या हातात देणारी अबला ठरणार की घरातील कर्त्यासोबत कर्तीदेखील होणार? 
 गंगूबाई काठीयावाड चित्रपटात पांढऱ्या रंगाचे लोभस वर्णन आहे. नीरक्षीर विवेक जाणणाऱ्या हंसाचा रंग ही पांढरा आणि पाण्याने न भरलेल्या ढगांचा रंग ही पांढरा आणि पाण्यापासून तयार झालेल्या बर्फाचा रंग ही पांढरा... रंगामागचे विज्ञान सांगते जो रंग आपल्याला दिसतो तो त्याचा नसतोच... इतर रंगांना धारण करून जो रंग तो घेत नाही तो आपल्याला दिसतो... स्त्रीने कोणत्या भावनेचा, स्वभावाचा रंग आपला नाही हे नक्की ठरवावे आणि या उत्सवात त्याचा त्याग करता येईल का असेही जरा स्वचिंतन करावे... हे चिंतन करण्याच्या बुद्धीचा जोगवा तिच्या पदरात घाल आई... 
समाजाने ठरवून दिलेल्या रंगांच्या परिघात स्वतःच्या छटेचा परीघ रेखून त्यात सर्वांना सामावून घेण्याचे ममत्व धारण करण्याचा स्थायी भाव तिच्यामध्ये दे आई... माऊली जगाचा उद्धार करत असते... अस्वस्थतेचा रंग धारण करणाऱ्या या जगाचा उद्धार करण्याची ताकद तिला दे..... आईला अहं नसतो म्हणून ती श्रेष्ठ.... म्हणून ती उद्धारू शकते.... ही स्त्री तुझे रूप आहे आई... तिला विचारांनी समृध्द कर आई... तिचा रंग तिला ठरवू दे आई.... तिला ठरवू दे....
उदे ग अंबे उदे.....
स्मिता माने
9422034863