Saturday, 27 October 2018

एक तास मराठीचा

आजची सकाळच शांत होती.... ठरवून मिळविलेली शांतता.
                  त्यात आज आमच्या विभागासाठी मराठी प्रशिक्षण वर्ग होता. विषयाशी संबंधित पाठांवर so called विवेचन असेल अशा काहीशा दृष्टीकोनातून मी बऱ्यापैकी फक्त आणि फक्त श्रोत्याच्या भूमिकेत होते. समाधान दादांना तयारी करताना बघून आपणही काही करावे का .....मग फलकलेखन केले. फलक लेखन करताना 'मन में लड्डू फूट रहे थे' ....अरे काय करत आहोत आपण...मस्त तारीख, वार, मार्गदर्शिका वीणा ताई पाटणकर यांचे नाव... पण एवढे लिहूनही कोरडेपणा जाणवत होता...मग स्वाभिमानाचे भरते आले ...आणि कार्यक्रमाची tag line लिहिली- लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... थोडासा उर भरून आला...माझ्या स्वतःसाठीच वातावरण निर्मिती झाली आणि थोड्याच वेळात वीणाताईनी  अगदी अनौपचारिकपणे व्याख्यान सुरू केले.
                 मराठी हा अध्यापनाचा विषय नसल्यामुळे पाठ्यपुस्तक , अभ्यासक्रम याविषयी माझी अगदीच उदासीनता होती. त्यामुळे नेमके कोठून ऐकू आणि कसे ऐकू याचा विचार सूरू होता. वीणाताई वातावरणात मोकळेपणा आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होत्या. अक्षरनंदन येथे २०.२२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर , मराठीच्या प्रेमापोटी, त्या अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून मराठी भाषेचा गोडवा शिक्षक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत होत्या. आपण जो यज्ञ सूरू केलेला असतो त्या यज्ञात आपण किती प्रकारे, नित्यनेमाने आहुती देवू शकतो ह्याचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या.
              मराठी भाषेच्या धड्यांचे तास अनुभविले होते. पण आजचा तास हा मराठी भाषा शिकण्याचा होता. पानसे बाईंची प्रत्येक वाक्याला आठवण येत होती.आमच्या नसानसात त्यांनी,  मराठी भाषेवरील प्रचंड प्रेम, स्वाभिमान जागृत केला. आज त्या सर्व गोष्टींची जणू उजळणी होत आहे याची जाणीव होत होती. आपल्या भाषेला आपण मातृभाषा का म्हणत असू ह्याचे उत्तर आज स्पष्ट झाले. ही भाषा आपल्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करीत असते. आपल्या भावना, आपली ग्रहणशक्ती, आकलन शक्ती,  व्यक्त होण्याची कला हे सगळेच आपल्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे आहेत. मराठी भाषेच्या माध्यमातून हे कंगोरे विकसित होत असतात. मग एक अध्यापक म्हणून, व्यक्तिमत्व फुलविण्याचे साधन म्हणून, मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित झाला. 
            पाठ्यपुस्तकातील पाठांचे एका मुख्य विषयांतर्गत एकत्रीकरण करून, विद्यार्थ्यांना  त्यांचा एकत्रित अनुभव कसा देता येइल, यावर वीणा ताईची खरोखरच mastery आहे. व्याख्यानाची सुरुवात कल्पनाशक्तीला साद घालून, स्मरणशक्तीला ताण देवून विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती कशी वाढवायची याने झाली आणि हळूहळू हे व्याख्यान साहित्यकृती पर्यंत येवून पोहचले. अभंग, भारुड, ओवी, कथा, रूपक कथा.....जस जशी एकेक नवे येत होती तसतसे आपले वाचन किती मागे पडले याची खंत जाणवत होती. पुस्तके आपल्याला किती अद्ययावत करीत असतात हे सर्वश्रुत आहेच, पण विद्यार्थ्यांना ज्ञान  देण्याचे व्रत घेतले असेल तर आपण स्वतः किती समृद्ध असावे याची जाणीव या व्याख्यानादरम्यान प्रकर्षाने झाली. छोट्या खेळातून , कृतीमधून आपण भाषेला साद घालू शकतो. माझ्या शालेय आयुष्यात पानसे मिस महिन्याभराचा स्वाध्याय देत असत. महिनाभर आधी निबंधाचे ५ विषय देत होत्या. जेणेकरून तो विषय आणि त्यासंबंधीचे विचार यावर महिनाभर अभ्यास व्हावा. एवढे नियोजनबद्ध असायच्या बाबी...
               प्रमाणबद्ध भाषा आणि बोलीभाषेचा लहेजा यावर देखील चर्चा झाली. भाषेचे सौंदर्य आपल्याला जपता आलेच पाहिजे, त्याचा गोडवा, ते साहित्य , ह्या बाबी त्या भाषेचा विशिष्ट ठेवा आहेत. अशा सर्व लोकांशी संवाद साधून त्यांना देखील त्यांच्या भाषेविषयी comfort zone आपल्याला देता आला पाहिजे. 
              असे एक ना अनेक मराठीची दालने आज माझ्यासाठी पुन्हा उघडली गेली. मनसोक्तपणे त्यामध्ये किती पाहू, किती  वेचू, किती साठवू अशी तारांबळ देखील उडाली. दीर्घकालीन किती राहील हे आत्ता नाही सांगू शकत ....पण आज खऱ्या अर्थाने कान तृप्त झाले. आणि हे सर्व भाव ओळखूनच की काय पण व्याख्यानाचा शेवट 'मनकवडा मोर' या कवितेने झाला.....ज्याचे मोरपीस अंगावरून फिरल्याचा आनंद या वीणाताईनी नक्कीच दिला.


Monday, 15 October 2018

काकस्पर्श

                             दोन दिवसापूर्वी लोकसत्ता रविवार पुरवणीत ' दिसते तेच खरे असते' या मथळ्याखाली विज्ञानाधारित लेख होता. विज्ञानाची अध्यापिका असल्याने विज्ञान, 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' याच तत्वावर आधारित असते, हे मान्य करण्यास वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मग तरिही दोन दिवसांपूर्वी डोळ्यांनी जे अनुभवले त्यास विज्ञानाचा आधार कसा देवू याभोवती विचार घोळू लागले.

                 आईचे बाबा, माझे आजोबा ज्यांना आम्ही 'मावशीचे बाबाच' म्हणायचो त्यांना देवाज्ञा झाली. वय झाले होते, आजारी होते. तशा सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या, समाधानी होते , पणतू , पणती  ह्यांना डोळे भरून पाहिले होते, पत्नी आणि डॉक्टरच असलेल्या मुलीकडून अगदी उत्तम , तत्पर सेवा मिळाली होती, अशा मनुष्य म्हणून अपेक्षित असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. आता फक्त कधी बोलाविणे येते ह्याचीच वाट बघत होते. आणि हे बोलाविणे आले, घटस्थापनेच्या दिवशीच सकाळी ७.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या जाण्याचे दु:ख करावे की, भूतकाळ आठवून ...बरोबर ६ वर्षापूर्वीच याच दिवशी , याच वेळी नियतीने वेळ साधली होती आणि तेव्हा मृत्युशी झुंज देवून ते त्या आजारातून सावरले होते हे आठवावे हेच कळत नव्हते. तेव्हा जगण्याची इच्छा शक्ती होती, पण यावेळेस हा तृप्त जीव मृत्युशी भांडत बसला नाही. दरवेळेस देवीच्या दारी नतमस्तक होणारे आमचे बाबा याच दिवशी देवीपुढे लीन झाले. आणि तिनेही तृप्त होवून त्यांना या जन्मीच्या भोगातून मुक्ती दिली. बाबांना तीन मुली, मुलगा नाही, हा दिवस 'मातामह श्राद्धाचा' असतो हे कळल्यावर अजूनच प्रश्न पडले.
                   अगदी चार दिवसांपूर्वीच मी बाबांना भेटून आल्यामुळे, निवांत गप्पा मारल्यामुळे , अगदी म्हणजे अगदीच निवांत त्यांच्याजवळ बसल्यामुळे त्यांच्या जाण्यावर माझा विश्वास बसेना, आणि दुसरीकडे आपल्याला सुबुद्धी झाली आणि आपण त्यांना निवांत भेटलो याचे समाधान पण होते. यावेळेस पहिल्यांदा माणसाचे जाणे किती अनपेक्षित असते याचा जवळून अनुभव घेतला. त्यावेळेस त्यांना एकच गोष्ट सांगितली, "बाबा, मी तुमची एक गोष्ट कटाक्षाने पाळते- ऐकणाऱ्यालाच सांगायला जाते, समजूनही जे ऐकत नाही त्यांच्या नादीही लागत नाही". शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेताना प्रत्येकवेळी बाबांचीच आठवण येते. त्यांनी आमचे बालपण समृद्ध केले. अजूनही त्यांच्या कुशीत जावेसे वाटते. मध्यंतरीच्या काळात संपर्क जास्त होत नसला तरी आपल्या वर प्रेम करणारी , आपल्या वाढीत मोठे योगदान देणारी माणसे सहजासहजी दुरावत नाहीत.
                   दुसरा प्रसंग त्यांच्या सावडण्याचा.... १५ ते २० मिनिटे झाली नैवेद्य ठेवून.......... नुकताच पितृ पक्ष झालेला; त्यामुळे कावळ्याने नैवेद्य खाणे याबाबतीतील चर्चा खूपच ऐकल्या होत्या. मग हिंदू संस्कृती, परदेशातील या विधींचा अभाव, तंत्रज्ञान कोठे गेले आणि आपण काय करत आहोत या सगळ्या बाबी डोक्यात घर करतात, खरे काय ,खोटे काय, सिद्ध करण्यासाठी काय करायचे ;संस्कृत चा अभ्यास केल्यामुळे मंत्रांचे महत्त्व जाणविते आणि शास्त्र शिकल्यामुळे विज्ञानाला पुराव्याची गरज असते हेही पटते.
                  ................ नैवेद्य खायला कावळा येईना, बाबांनी सांगितले होते माझा दहावा , तेरावा काही घालू नका, काही पाळू नका, मी खूप समाधानी आहे, मग हे समाधान चालीरीती च्या वेळी का दिसेना, पुन्हा एकदा विचारांची दिशा सुन्न. जाणत्या लोकांनी घरच्या मंडळीना पुन्हा पाया पडायला सांगितले, आई, ताई, सोन्यामावशी पाया पडले, आणि मनातील किंतु घालविणारे वाक्य बोलले आणि ....एकविसाव्या शतकातील माणसापुढे पुढच्याच दुसऱ्या क्षणात कावळा दिमाखात उभा होता. इतका वेळ कोठेही न दिसणारा तो कावळा क्षणार्धात प्रकट झाला, घास खाल्ला, नैवेद्याला एक फेरी मारली आणि निघून गेला. सगळेच निशब्द फक्त रडण्याचा आवाज.....आणि माझा विचारांचा प्रवास....... "दिसते तेच खरे असते" , कोणाला काही पटवायला जावू नये, त्याला त्याच्या अनुभवातून शिकायला लावावे.....आणि आपण स्वतः अनुभवाने समृद्ध व्हावे. जगात ऊर्जा असते....जशी सकारात्मक असते तशीच नकारात्मकही ऊर्जा असते. त्या उर्जेची रूपे अनुभवायची असतात.
                 बाबा, त्यादिवशी मिठी मारू की नको या विचारात मिठी मारलीच नाही.....अजूनही शांतपणे तुमच्या जवळ बसावे वाटते. तुम्ही कधीच टेंशन घेतलेले दाखविले नाही, पण तुमच्या डोक्यात असणारी काळजी ही नक्कीच जाणविली.....Thank you, बाबा