Saturday, 7 August 2021

संक्रमणाचे आठ दिवस.....

         खूप दिवसांनी लिहायला बसले आणि ही बैठक जमून आली याबद्दलच समाधानी आहे. संक्रमणाचा हा कालावधी होता हे प्रकर्षाने लक्षात आले. म्हणून लेखाचे नाव तद्नुषंगाने ठेवले.

        भाऊ(स्व. वा. ना. अभ्यंकर) सांगायचे की कोणत्याही गोष्टीची सवय होण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी लागतो. बाबांचे प्रत्यक्ष नसणे यासाठी हा कालावधी झालेला आहे. त्यांच्या अप्रत्यक्ष असण्याची सवय करून घेण्यासाठी मला हा कालावधी महत्त्वाचा वाटतो. त्यांचे अप्रत्यक्ष अस्तित्व स्वीकारून मार्गक्रमण सुरु ठेवायचे आहे. ही जागरुकता, शहाणपण निसर्गाच्या सानिध्यात आपली आपल्यालाच समजत जाते आणि हळूहळू दृढ होत जाते. 

        या आठ दिवसात हाच निसर्ग मला उपदेश करता झाला तो लेह लडाखच्या डोंगरवाटेमध्ये. मागच्या वर्षी वीणा वर्ल्ड तर्फे book केलेली, lockdown मुळे रखडलेली  सिक्कीमची ट्रीप  यावर्षी लेह लडाखच्या वाटेवर घेऊन आली. बघायला गेलो तर शुष्क कोरडा प्रदेश..... भूगोलाच्या पुस्तकात वर्णन केलेली जमिनीची अपरूपे चार ते पाच वाक्यात असणारी इथे वैविध्याचे आविष्कार घेऊन आपल्यासमोर उभे आहेत. खरेच त्यांच्या मनात काय सुरु आहे याचा अंदाज घेता येत नाही. कधी रेतींची बनलेली, कधी छोट्या गारगोटी दगडांची बनलेली तर कधी मोठे मोठे पथ्थर एकावर एक रचलेले, कधी विस्तृत घसरण, कधी वेगवेगळ्या अनंत वळ्या, तर कधी मातीवर दगडांचे सुंदर नक्षीकाम. centre of gravity चा अचूक अंदाज, मोजमाप घेता येईल का? त्यांची एकमेकांवर असलेली रचना बघून एकाने जरी आपली जागा सोडली तर.... Avalanche.... सतत भीतीचे छत्र पण तेवढेच लोभस आणि आकृष्ट करणारे. फोटो तरी किती काढायचे आणि कशाकशाचे काढायचे? 

    नेमकी सुरुवात , मध्य, शेवट कसा वर्णन करू? काराकोरम डोंगरांच्या या रुद्र अवताराला थंडावा देणारा तो बर्फ..... पांढराशुभ्र, सफेद मुकुटमणी...... त्याच्याच वितळण्याने खळखळाट करत वाहत जाणाऱ्या थंडगार सौंदर्यवती  नद्या..... जिच्यामुळे आपण उदयास आलो ती सिंधू नदी नतमस्तक झाल्याशिवाय रहावत नाही. River of death म्हणून परिचित असलेली श्योक नदी, आकाशाचा निळाशार रंग स्वतःमध्ये सामावून घेणारी हुंडेर नदी कितीही काळ त्यांच्या काठाशी बसायला मिळावे अशी इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय रहावत नाही. नदीकाठी पण नदीच्या पाण्यात पाय सोडण्याचे धैर्य नक्कीच होत नाही. या नद्यांनी स्वतःचे पावित्र्य जपलेले आहे. 

    इथे तुम्हाला जमिनीची अपरूपे जशी बघायला मिळतात तसेच पाण्याला अनेक रंगछटा असतात याचेही दर्शन होते. Pangonk lake - १३५ किमी पसरलेला..... त्याला हिरवा म्हणावा, मोरपंखी म्हणावा कि निळा म्हणावा? की सगळ्यांना सामावून घेणारा? त्याच्या ठायी बसून काय हितगुज करणार तुम्ही? तुम्हीच इतके शांत होऊन जाता की स्वसंवादही करणे जड होऊन जाते. दिवसा, सायंकाळी सूर्यकिरणांचे त्यावर अधून मधून पडणारे तेज, पावसाच्या सरी, ढगाळ वातावरण, हवेतील गारवा, आणि रात्री वेड लावणारे ताऱ्यांचे आच्छादन..... हे सगळं डोळ्यात साठवण्याची, स्मरणात ठेवण्याची तुमच्याकडे किती क्षमता आहे? हाच मनाला पडलेला प्रश्न...... त्याकाठी ध्यानस्थ होऊन या अपारशक्तीला तुम्ही केवळ वंदन करू शकता. 

    प्रवास.... इथला प्रत्येक प्रवास खडतरच असतो, कारण त्याचे फलित शेवटी एका मनोरम, आनंददायी स्थळी पोहचवत असते. आत्ता तुम्हाला असे वाटते कि तुम्ही खाली गावातून जात आहात आणि पुढच्या पाच  ते सात  मिनिटात बाजूला बघितले कि लक्षात येते कि तुम्ही समोरच्या डोंगराच्या छातीशी आहात. आणि पुढे जाणाऱ्या गाड्या अजूनही वर आहेत. त्या रस्त्यावरून दोन गाड्या पास होऊ शकतात का असा प्रश्न डोकावीत असतानाच समोरून मिलिटरी चे मोठे trucks येताना दिसतात आणि जागा काढणे म्हणजे नेमके काय याची प्रचिती तुम्हाला याची देही याची डोळा अनुभवायला मिळते. वर बघितले तर हिमालयाच्या सफेद  रांगा, खाली बघितले तर नद्यांचे सतत वाहणारे प्रवाह आणि समोर बघितले तर डोंगरातून निघणारे वळणावळणाचे मार्ग.... प्रत्येक वळण वेगळे! सर्व निसर्ग तुमच्या दिमतीला. तपकिरी रंगही तुम्हाला आवडू लागतो. मग निसर्गाच्या नेहमी आवडणाऱ्या हिरव्या रंगाचे अस्तित्व इथे तसे कमीच. पण जिथे जिथे आढळला तिथे त्याचे स्वतःचे अस्तित्व त्याने खुलवून ठेवले होते. छोटी रंगीबेरंगी फुले घेऊन विरळ स्वरुपात तो होता..... अशाही वातावरणात तग धरून होता.

    आपण ज्या परिसरात असतो त्या परिसराच्या vibes तुम्हाला साद घालत असतात. इथे जिथे तिथे केवळ साहस, धैर्य, सकारात्मकता याच vibes चे दर्शन झाले. साहस करण्यासाठी तुम्हाला दगडासारखे टणक, रुद्र रूप धारण करावे लागते पण त्याच वेळी बुद्धी स्थिर ठेवावी लागते. दगडांच्या माथ्यावर असलेला हा बर्फ, हवेतील गारवा  ही अपेक्षित शांतता मिळण्यासाठी पूरक ठरत असतील कदाचित. म्हणूनच तुमच्या क्षमता आजमावण्यासाठी ही सुयोग्य जागा आहे. तुमच्या बाजूने अनेक bikers धाडधाड आवाज करत एकामागून एक जाताना दिसतात..... passion.... चांगला पास, खार्दुंगा पास पूर्ण  केल्यानंतर त्यांना driving ची अनुभूती नक्कीच लाभली असेल. Oxygen level कमी असताना स्वतःला ताणायचे....नव्हे आजमवायचे.... मग bike च कशाला? सायकलवर जाऊ असेही म्हणणारे बहाद्दूर आम्हला इथे भेटले. 

    इथले रस्ते साद घालतात, डोंगररांगा साद घालतात.... ज्याला प्रतिसाद द्यावासा वाटला त्यांनी स्वतःला आजमावले आणि कदाचित त्यांना आयुष्याचा सूर, ध्येय गवसले असेल. इथे वयाचे बंधन नाही हे विशेष.

    जशी निसर्गाची रूपे आढळली तशीच माणसांचीही रूपे आढळली. खूप अनोळखी असणारी माणसे कमी कालावधीत कशी सहजपणे connect होतात हेच समजत नाही. सहज होणाऱ्या गप्पामधून काही सूत्रे गवसतात. माणसे आयुष्याकडे कशी बघतात हे समजून घेताना आपण तुलना करू लागतो. त्या त्या परिस्थितीला प्रत्येकाने दिलेले वेगळे उत्तर असते. असाही विचार करता येऊ शकतो की हा आपल्याला गवसलेला दृष्टीकोन असतो.  आयुष्यात खूप काही बघितल्यानंतर परिस्थितीला सामोरे जाण्याची शांतता तुम्हाला हवीहवीशी वाटू लागते. पाय जमिनीवर, नेमके काय करायचे आहे आणि का करायचे हे ठाऊक असणारी माणसे जेव्हा तुमच्या आजूबाजूला येतात तेव्हा त्यांचा कमी कालावधीचा सहवास हा कायम स्मरणात राहतो. 

    या कालावधीत दोन पुस्तकांचे वाचन करू शकले याचे सर्वात मोठ्ठे समाधान. वाचायचे होते. सतत वाटत होते एका बैठकीत वाचन घडावे पण होतच नव्हते. पण तुमच्या याही बाबी कदाचित लिखित असतात. पुस्तके पण सहज निवडली होती पण ती पूरक ठरली. रामचंद्र जोशी अनुवादित  साद देती हिमशिखरे आणि  वि. वि. पेंडसे लिखित भगिनी निवेदिता. सर्वसंगपरित्याग, ध्येय दर्शन, गुरूंचे मार्गदर्शन, इप्सित गाठता येणे, हिंदू धर्म, अध्यात्मशास्त्र यांचा मिलाफ असलेली ही पुस्तके. प्रेरक आणि विचार करायला लावणारी. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या पण प्रत्येकाला त्याची आस. ते मिळवण्याचे मार्ग निराळे, ते नेमके मिळाले आहे कि नाही  कितपत मिळाले? आता पुढे काय हेही सांगता येईल कि नाही हे माहित नाही. पण प्रत्येकाचा प्रवास त्याचसाठी.... भीषणाची पूजा करता आली पाहिजे हा विवेकानंदाचा संदेश. मनातील भावनांना बंध घालता आले पाहिजेत कदाचित तेव्हाच ध्येय साध्य करता येईल. 

        इथे बघितलेली स्थळे, भेटलेली माणसे, घडलेला प्रवास, तंबूत थंडीत घालवलेल्या रात्री, मिळालेले संदेश हे सारेच प्रेरक आणि मरगळ दूर करणारे आहे. इथला निसर्ग रौद्र रूप धारण करतो तेव्हा तो भीषण नक्की वाटत असेल. पण इथले सैनिक याची पूजा करताना दिसतात. त्यांच्या कॅम्प ठिकाणी एक वाक्य वाचले त्याचा आशय असा होता कि, आयुष्यात कधीतरी तुम्हाला करावेसे वाटणारे साहस हे आमच्यासाठी रुटीन आहे. खूप काही लिहिण्यासारखे आहे पण आत्ता या नोटवर नक्की थांबावे असे वाटले.