Friday, 20 November 2020

माझे मौनाचे प्रयोग

    केवळ नाम साधर्म्य आहे असे समजावे ... आत्ताशी पाण्यात पडले. सिद्धता अजुन यावयाची आहे. पण स्पर्शच सुखावह होता की सांगितल्याशिवाय राहवेना. म्हणून हा लेख...किंवा अनुभव कथन...
मौनाचे तास, मौन संवाद, असे अनेक शब्द परिचयाचे असतात. काहीही प्रतिसाद त्यावेळी बोलून द्यायचा नाही. Be viewer of the incidence... And just observe yourself also.
Art of living चा advance course केला होता. त्यादरम्यान तीन दिवस मौन ठेवले होते. पण त्यांचे sessions सुरू असायचे. त्यामुळे आपण मौन केले आहे याचा कौटुंबिक, सामाजिक अनुभव घेता आला नाही. तेव्हाचा अनुभव  वेगळ्या विश्वाचे दर्शन करणारा होता.
         याच विश्वात राहून असा काही मौन पाळता येईल का? असा विचार डोकावला. आणि स्वतः वर असे प्रयोग करून बघता यायला हवेत याच एका उद्देशाने माझा protocol मीच तयार केला. Protocol आपला असला तरी स्वतःही त्याच्याशी cheating करायची नाही हा एक clause त्यामध्ये add केला.
            दिवाळीच्या सुट्टी सुरू.. त्यामुळे म्हणावा तसा निवांतपणा होताच.. व्यक्ती संवाद हा कामापुरता असल्याने आणि कामे माहीत असल्याने माझ्या मौनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची खात्री होती. कौटुंबिक पातळीवर हे ठरले. आणि मौन कामाच्या वेळेत करायचे आणि अनुभव गाठीशी घ्यायचे  असाही विचार होता. पण हाच नियम WhatsApp, social media साठी पण पाळला. तेवढ्या कालावधीत फोन करायचे नाहीत. WhatsApp ला हात लावायचा नाही असेही ठरवले. आणि खरेच कोणाचीही काहीच अडचण झाली नाही.
सोमवार मंगळवार तीन तास मौन... 'माझे मौन आहे' हे कोणाला जाणवले ही नाही.... वावा.. मलाच बरे वाटले. नंतर जरा तास वाढवले.  पाच तास, सात तास...
        Sign language सुरू झाली. समोरच्या व्यक्तीच्या हेच लक्षात येत नाही की मी फक्त बोलत नाही. ऐकू शकते. ते सुद्धा आपल्याशी हातवारे करून बोलायला लागतात. मज्जा आली. आपली न बोललेली भाषा कोण समजू शकते, न बोलताही आपल्याला पोहचता येऊ शकते का... असे काही प्रश्न मनात डोकावले.
       लहान मुलांचा acceptance खरेच खूप बढिया असतो हे या निमित्ताने अनुभवले. अभिषेक अक्षरशः enjoy करायचा. माझे तेच शब्द तीच वाक्ये त्याच टोन मध्ये बोलायचा. त्याच्याकडून काही चुका झाल्यावर तर म्हणाला बरे झाले मौन आहे नाहीतर आख्खे भाषण ऐकवलं असतं आत्ता... आणि मग आपण अंतर्मुख होतो. या दरम्यान तर त्याला दवाखान्यात पण घेऊन जावे लागले. असे वाटले की कदाचित आता मौन सोडावे लागणार. पण आईचे मौन पूर्ण करायचे असे बहुधा त्यानेच ठरवले होते. डॉक्टरांशी बोलणे, मला काय सांगायचे आहे असा सगळा संवाद त्याने मस्त पार पडला. आणि मग मी एक शिकले आपण मुलांना व्यक्त होण्याची संधीच देत नाही. एक व्यक्ती म्हणून संधीचे सोने त्यांनाही करायचे असते आणि ते ते करतात. माझी sign language decode  करताना देखील तो बरेच प्रांत फिरला.थोड्या प्रमाणात का होईना explore केले त्याने. अजुन एक समाधान माझ्या पदराशी पडले. अडत नाही काही. अलिप्तता घेतली की सौंदर्य अजुन खुलून दिसते.
          मग आता  पुढे? अजुन काय stretch करायचे की काय करायचे... चला आता एक दिवस पूर्ण मौन... आवडीचा वार शुक्रवार... जन्मदिवस ना...जरा नाळ जोडलेली आहे. Basic instructions आदल्या रात्रीच देत होते.. पण 'माहिती आहे'..आता काही सांगू नको असा अभिषेकनेच विश्वास भरला..
         आलेले फोन कॉल स्वीकारायचे पण बोलायचे नाही. समजून घेतात लोक. आणि आपल्याला oppose होणार नाही आज या जाणिवेने तर संधी म्हणूनही कॉल करतात. आपण काय काय react झालो असतो आत्ता असे वाटून गेले. आणि मनातल्या मनात मस्त हसू उमटते. आपणच आपल्याला judge करू लागतो. आणि इतरांच्या नजरेतून आपण कसे आहोत याचा प्रामाणिक अंदाज आपल्याला नक्की येतो. 
         Jokes apart... काय निष्पन्न झाले? Determination.. ठरवलेले पूर्ण करता येते का? हे समजले. त्यासाठी साथ कशी मिळते हेही लक्षात येते. कार्य पूर्ततेसाठी नवीन वाटांचा शोध झाला. स्वतःचा आणि इतरांचाही.... Wavelength जुळते.
       आणि सर्वात महत्वाचे organised व्हायला वेळ मिळतो. अनेकदा ऐकतो स्वतःला वेळ द्या. पण म्हणजे नेमके काय करा हे स्वतःलाही नेमके माहीत नसते. तो नेमकेपणा आणायला म्हणजेच organised व्हायला आपणच आपल्याला  यानिमित्ताने संधी देतो. 
        प्रत्येकाचीच दोन मने असतात. त्या दोघांनाही वाटत असते आपले ऐकून घ्यावे. त्या दोघांचेही ऐकायला वेळ मिळतो. आणि मग लक्षात येते काही निर्णय किंवा वागणे आपण दोन्ही मनांचे पूर्ण ऐकून न घेताच घेतलेले असतात. कारण आपल्या समोर तिसरी व्यक्ती असते आणि पूर्वग्रह नुसार आपल्याला त्या व्यक्तीला follow करायचे असते किंवा विरोधात जायचे असते.
       अशा प्रकारचे आपले वागणे असू शकते असा माझा एक विचार झाला. मौनाचे अजून प्रयोग करताना may be यावर पण भरपूर आंदोलने होतील. पण ती मी शांतपणे enjoy करू शकेल बहुतेक..
गाठीशी अजून काही भावपूर्ण अनुभव आले. मुलगी उद्या दिवसभर बोलणार नाही म्हणून बाबांचा आदल्या रात्री आलेला कॉल, आपले बोलणे ऐकायला आसुसलेले सासू सासरे, अभिषेक शी tuning, WhatsApp वर इतरांचे status न पाहिल्याने विचारांमध्ये येणारी स्थिरता, आणि ठरवलेले करू शकतो हा आत्मविश्वास. .. म्हणजे इतके की आत्ता कोणी बोल म्हटले तरी तोंडातून शब्द फुटेना... हे बघून माझे मलाच विचित्र वाटत होते जरा...
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या लेखनाच्या प्रसवकळा....lockdown च्या काळात अनेक नवीन गोष्टी शिकले आहे. अनेक नवीन अनुभव गाठीशी होते... लिहावे असे वाटत होते पण .... असो... ते organised च होत नव्हते. या स्वतः वरील प्रयोगाने स्थिरता नक्की लाभली ..
           असेही युक्तिवाद होऊ शकतात..की मग आता बोलूच नका.. रहा शांत... पुन्हा विज्ञान... ज्या क्षमता दिल्या आहेत त्यांचा वापर झाला नाही तर त्यांची गत माणसाच्या शेपटासारखी होते.. .. विश्रांती आणि कायमची झोप यात काहीतरी फरक आहे ना...
मौन.. म्हणजे पुणेकरांची... १ ते ४ ची special tip... Enjoy this form of वामकुक्षी..

Sunday, 19 April 2020

वर्तमान जगताना....

.
            Hi.... सगळं कसं चिडीचूप झाले आहे ना.... मला हे करायचे , मला ते करायचे, हे असेच झाले पाहिजे, मला असेच लागते... मला वाटलं म्हणून हे केले. सगळच शांत एका क्षणात... सगळं कडीकुलूप बंद! मग कशासाठी होती ही धडपड.... केवळ कटपुतली आहोत  का आपण? पुन्हा पुन्हा हेच सिद्ध होणार आहे का? ‘आनंद’ चित्रपटमधला famous dialog..बाबू मोशाय... ‘हम सब तो रंगमंच की कटपुतलीया है!’
            If you can’t go out side go inside! अनेकांनी हे या आधी बऱ्याचदा सांगितले. पण ..पण आता ते बहुतेक पटायला लागले असावे म्हणून अनेकांच्या whatsapp status वर झळकत आहे. मानवी जन्म लाभला आहे हो मला. भूक, भय, निद्रा, मैथुन या चार गरजा मला प्राणी या जगतात स्थान देतात. but...m gifted one! माझी बुद्धी..मला मिळालेली ही देणगी मला कालपरवापर्यंत उच्च स्थान देत होती. मला पडणारी स्वप्ने मला स्वस्थ बसू देत नव्हती. शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य या नवरसांनी मी नटत होतो. माझे भविष्य लिहिण्याचा आणि घडविण्याचा अविरत प्रयत्न करत होतो. नजर केवळ भविष्याचा वेध घेत होती. तिथपर्यंत पोहचायचे आहे. त्यासाठी हा protocol. तो continuously follow करायचा. हा कोरोना येईपर्यंत या दिनक्रमात काहीच fault नव्हता. आम्ही आनंदी होतो, सुख दुःख जसजशी येत होती त्याला सामोरे जात होतो. आम्ही जगत होतो.
            पण आता... एका क्षणात सगळे statue ! भविष्य नेहमीच अंधारात असते हे पटायला लागले.
आपण नेमके का जगत आहोत? या जन्माचा काय नेमका हेतू? हे प्रश्न आता पडायला लागले आहेत. आपला survival factor नेमका काय आहे? आजचा दिवस माझ्या आयुष्यात आला आणि हा दिवस मी नेमका कसा जगत आहे? कामासाठी मी आहे की माझ्यासाठी काम आहे? जगण्यासाठी जी जी आवश्यक कौशल्ये असतात ती मला माझ्या शाळेने, कुटुंबाने, परिस्थितीने  दिली आहेत का? परिस्थितीला तोंड देण्याची भावनिक, आर्थिक कुवत माझ्यामध्ये आहे का? माझी मानसिक आणि शारीरिक क्षमता यांचे लागेबंध आहेत का? या सर्वांची उत्तरे शोधण्याची ही वेळ आहे. उत्तरे जर “नाही” असतील तर मी केवळ परावलंबी आहे... हातात असलेला वेळ ही उत्तरे “हो” कशी करता येतील यावर काम करण्याचा आहे असे नक्की वाटते.
            हे lockdown कधी संपेल आणि काय याचा जर सतत विचार करत राहिलो तर पुन्हा पुन्हा तीच चूक करू... अंधारात असलेल्या भविष्यासाठी आधी शरीराची तगमग केली आता मनाची घालमेल करू. खूप प्रश्न आहेत. खूप... नोकरी टिकेल की नाही, व्यवसायाचे काय होईल? घराचे, गाडीचे हप्ते या प्रश्नापासून आज संध्याकाळी जेवण मिळेल की नाही इथपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न निर्माण झाले आहेत. आज account ला पैसे आहेत पण खर्च कुठे करायचा हा प्रश्न आहे आणि दुसरीकडे सरकार मदत देऊ करत आहे पण माझ्याकडे account च नाही असे प्रश्न आहेत. सगळेच जण एका स्तरावर आलेले आहेत. आयुष्य टिकवायच आहे... बस... सर्वांची एकच इच्छा!
सध्या दुसरा दिवस आपल्या आयुष्यात येणे हाच बोनस असणार आहे.
शाळेत हसरी बोल फुले काव्य संग्रहच्या निमित्ताने नवा दिवस ही मंगेश पाडगावकर यांची विश्वास जागवणारी कविता वाचनात आली. सध्या साहित्य वेगवेगळ्या स्वरुपात इतके भेटीस येत आहे की आपल एवढे वाचन राहिले होते हा प्रश्न  पडावा. प्रत्येकाला काही ना काही सांगायचे आहे. पण ऐकणारा समोर नाहीये. मग त्याला अनेक माध्यमातून मी सांगत आहे, त्याचे ऐकत आहे. मला जगण्यासाठी हे संभाषण आवश्यक आहे. मला हितगुज करायचं आहे, ते ऐकणार, समजून घेणार कोणीतरी हवं आहे.  मग ते सार्थ तत्वज्ञान असो किंवा वायफळ बडबड असो, हे संभाषण मला हवे आहे. इतके दिवस ज्या मोबाईलला सगळे दोष देत होते, तोच आज तारणहार म्हणून मदतीला आला आहे. ज्ञान, मनोरंजन, भाव सगळी गरज तो भागवत आहे.
हेच सगळे दृष्टिकोनातील बदल घडत आहेत.. स्वतःमध्ये होणारे बदल अनुभवा. हा दिवस, हा क्षण मी कसा घालवत आहे हे बघा. मज्जा येते. एक वेगळा आनंद असतो. मी बदलत आहे हे आपलं आपल्याशी एक गुपित आहे. “बदल अपरिहार्य असतो’ या बदलाचे आपणच आनंददायी साक्षीदार या वर्तमान घडीला होऊया.
            कोणताही बदल आचरणात आणायचा असेल, कोणतीही गोष्ट सवयीची व्हायची असेल तर ती किमान 90 दिवस करावी लागते. चीनचा lockdown 90 दिवसांचा होता. घरात राहणे हे सवयीचे होऊ लागले तर? आज जसे घरात राहणे त्रासाचे तसे उद्या बाहेर पडण्याची वेळ आली तर ते त्रासाचे होऊन कसे चालेल?
            आपल्याला आपला survival factor सक्षम बनवता आला पाहिजे. जो मला परिस्थिती समोर उभे राहण्यास मदत करेल. परिस्थितीनुसार माणूस बदलतो. त्याला बदलावे लागते. तर आणि तरच तो तग धरू शकतो. पण हा बदल जेवढ्या लवकर स्वीकारला जाईल तेवढ्या लवकर वर्तमान सुकर, सुसह्य होत जातो. याच भूमिकेतून  भविष्य पण कधीतरी वर्तमान होणारच आहे की. तो वर्तमान पण तितकाच सुकर, सुसह्य होईल.  
            आजचा क्षण साठवूया... समृद्ध करूया... तोच शिदोरी म्हणून साथ देणार आहे. 

Wednesday, 1 April 2020

फेरफटका


Scene १
       'अभिषेक, ए  अभिषेक उठ बरे... ५.३० वाजून गेले ..उठ बर..मी किचनमध्ये कधी जाऊ? सगळा वेळ तुला उठवण्यात जाईल ..उठ पटकन... आगाशे काका वेळेत येतात...चांगलं वाटतं का त्यांना वाट पहायला लावण .... झाली दिवसाची सुरुवात....तीन डब्यांमध्ये काय काय दिले ....कोणता पदार्थ आवडीचा आणि त्याच्या बदल्यात कोणता पदार्थ compulsory खायचा याची आठवण करून देऊन वेळेत रिक्षा गाठली...
       चला आता मस्त गाणी ऐकत ४ फेऱ्या माराव्या...दिवस माझा करून घ्यायचा असेल तर हा musical dose must आहे. चालताना आपण एकटे असल्याचा फील न येता आपण आपल्या विश्वात राहिल्याचा फील देतात ही गाना वरची गाणी... वा दिन बन गया....ओ लडकी beautiful......दिवसभर हे गाणे आता गुणगुणायला मोकळी...
Scene २
       ओ ...अहो.. नाष्ट्याला पोहे....चहा रेडी आहे.... डबा घ्यायला कोणाला पाठवणार आहात...अभिषेक ३.१५ वाजता सुटेल..कोण घ्यायला जाणार आहे. वेळेत पाठवा... नाहीतर हे पोरग मला call करत बसतं...मी तासावर असते ..फोन नाही घेऊ शकत...
       माई चहा झाला आहे... हा कोणी प्रसाद दिला आज? तुमच्या योगासनाला बर आहे..देवदर्शन चालू असतं सतत कोणाचं तरी...यावेळी कक्कर aunty की देसाई काकू....आज दोडक्याची चटणी आणि मटकी करते...
तोपर्यंत कानावर हाक....”कुठे आहेत अण्णा?” “काय काका जिम ला जाऊन आला का?” स्मिता madam मस्तपैकी आल्याचा चहा करा...डॉक्टर काका आले आहेत. इति अण्णा... हो अण्णा ....इति मी ...
       “ताई आम्ही आलो ....” “धन्यवाद ...तुम्ही घरात येईपर्यंत माझा जीवात जीव नसतो....” “अहो ताई येणार म्हणजे येणार”....लई काळजी करता... बर किती चपात्या किती भाकरी... सांगा पटापट....इति आमच्या दोन्ही मावश्या....
       “माई थोडं परीक्षांची काम सूरू आहेत , यायला उशीर होईल....येते मी ..अभिला जास्त झोपू देऊ नका....”
Scene ३
       ९५ बिग FM वर मस्त गाणी... जुनीपुराणी .... माहोल बन गया... देवा.. हे चौकातले रिक्षा वाले कधी सुधारायचे...फूट पाथवर टू व्हीलर... आवारा ... या बसेस तर ... त्यांच्यासाठी separate रोड, separate सिग्नल..तरिही हा असा performance ... भगवान उठा ले रे ..उठा ले...
       मातोश्रीकडे चक्कर मारावी आज जरा...कालच आल्या आहेत गावावरून... मनुताई एक कप चहा? ...बाबा फक्त चहाच...आईला सांगा उपाशी निघालेली नाहीये घरातून ..उशीर झाला आहे... आई, ताई फक्त तुम्ही आल्यावरच येतात ..इति स्नेहल आणि श्रीकांत .... मनू चल शाळेत आपलं तू माझ्याबरोबर ...आत्तुला सगळे रागावतात ..तूच माझी चल....
आज बाहेर बऱ्याच गाड्या दिसत आहेत...मनोहर मध्ये काही कार्यक्रम की पालक बैठका....hi मिस करणारी ही पोर... नुसतं म्हणायला शाळा ११-६ ..सकाळी ९/१० वाजल्यापासून शाळेत रमतच असतात ...ग्राउंड भरलेले बघायला मज्जा येते... हे शंभू सर ग्राउंड नुसते स्वतःचे करून टाकत असतात...आज मातृमंदिरमध्ये गुरुकुलाचा कार्यक्रम आहे वाटतं..बरीच तयारी सूरू आहे...गाडी लावायला जागा मिळाली ..hushhh
Scene ४
good morning लोलिता...कशी आहेस... आज आमच्यासाठी काही bulletin चा खाऊ.... “विद्यामिसने दिला की आणतेच” “धन्यवाद madam....चला दिवस सूरू झाला आमचा आणि तुमचा पण....” माणसांच्या की टेबलवरच्या कागदांच्या गराड्यात असणाऱ्या शिवराजदादाचे दर्शन झाले....आमच्या डोक्यातील विषय मांडायला कधी वेळ होणार कोणास ठाऊक? शीतल ताईच किती वेळा व्यासमुनी व्यासमुनी करत येऊन गेली आहे... असो..
वा..इतनी शक्ती हमें दे ना दाता...आपली आवडती प्रार्थना... कर दे पावन हर इक मन का कोना.... मस्त म्हणाल्या मुली...विद्या मिसचे विद्यार्थ्यांचे कौतुक करणारे निवेदन...वावा यावर्षी भरपूर बक्षिसे झाली ..मस्त
दाराशी वाट बघणारे आर्या, ज्ञानेश्वरी, श्रीपाद, डेस्क च्या बाजूला बसणारे श्रुती, अथर्व , सई, ओरडणी खाणारे प्रणव, वेदांत हांडे, आत्रेय, आभोणकर, फिसिफिसी हसणाऱ्या प्राप्ती, ऋतुजा ...लक्ष देऊन ऐकणारी सृष्टी, ओजस्वी... सगळेच माझे.... काहीही बोला... मिस म्हणत बिलगायला येतातच...
हा आख्खी शाळा फिरणारा प्रथमेश नारळे आणि कृष्णा मोटे, तासाला जस काही मला उचलून घेऊन जायचं आहे अशा आवेशात तासाला बोलवायला आलेले श्लोक, सार्थक आणि प्रसाद, स्टार मिळविण्यासाठी मागे लागणारे सिद्धी, आकांक्षा, शौर्य, गंधार, तासाला आपल्याच धुंदीत असणारा ओम, शिव, शिवम...
मिस तुम्ही सांगा हो फक्त ..करतो असे म्हणणारी विस्मया, काहीना काही सांगायची चिमट असणारी वैदेही, सांज, वसुंधरा, उत्तरे बरोबर आली किंवा चुकल्यावर चेहऱ्यावर भाव उमटवणाऱ्या सृजा, आर्या, सृष्टी, मृदुला , राधिका.... अरे सगळ्याच बोलक्या.... गोंधळ न घालता चेहऱ्याने बोलणाऱ्या माझ्या लेकी, प्रश्नांचे भांडार असणारा ईशान, कपाळावर आट्या असणारा शिवांग, डोळे मिटून दूध पिणारा शाश्वत आणि अपूर्व, याच्यावर रागवावं की हसावे असा माझा गोंधळ करणारा स्वराज... कसेही असेनात का ..मनापासून ऐकतात माझ... भारी वाटतं...वर्गाचा कोपरा न कोपरा बोलका असतो...
Scene ५
“जेवायला कोण कोण येत आहे? मला भूक लागली आहे...मी सुरुवात केली आहे ....माझा नंतर तास असतो....” आलोच ताई ...एक मिनिट....जिना चढत आहे.... तुम्ही बसा ...माझी एक meeting आहे आत्ता...श्रीराम, अवधूत, आदित्य, अस्मिता, गायत्री, प्रियांका, कल्पेश  आणि मजल दरमजल करत येणारी आरती...अवधूतचा गरमागरम डबा आणि आजची भाजी ओळख...मेथी की तांदुळाचा...असा तोंडी लावायला प्रश्न आरतीचे चारचार डब्बे.... श्रीराम च्या collection मधले हटके गाणे आणि दिलखुलास गप्पा....एकदम स्वच्छंद .... सोयाबीन ते आगगाडीच्या डब्यापर्यंत यथेच्छ विहार...मध्येच प्राचार्यांच्या  ऑफिसमध्ये असणारा दहावीचा  बोर्ड सगळेजण वाचून येतात....आणि all is well म्हणत म्हणत डबा संपवतात...
Scene ६
असाच दिवस उतरणीला लागायला लागतो...देवळेकर सरांच्याकडे जायचे तर आधीच waiting ला चार जण दिसलेले असतात....ऑफ तासाला bulletin असतं किंवा पेपर टायपणं असतं किंवा अकारिक तपासणी ...किंवा कार्यशाळा काम, वृत्त लेखन, फोटो संकलन  किंवा ppt बनवणे आणि हे काही नसेल तर कधीकाळी घेतलेली उचल ..त्याचा हिशोब पुरा करणे असतेच किंवा etech माहिती पुरवणे किंवा याद्या print काढून देणे हे तर असतेच असते. येता जाता समाधान दादा ... ताई आपल्याला हे करायचं आहे बर का.... मस्त करू आपल्या विभागाचं.... असं सुचवण असतं... कामथे सर, वर्षा ताई, आंबेकर मिस, दीपाली ताई, स्वाती ताई, सुपे ताई, सीमा ताई,श्वेतल ....हे झाले का....ते झाले का.... जरा म्हणून उसंत नाही.....पण मस्त कामे झाली आजची....दादाला reporting..... स्वाहा .... झाले...केले....करत राहणार.....

Scene ७
हे सगळ करायचं म्हणजे energy ड्रिंक ..चहा तर हवाच.... त्याशिवाय का हे शक्य.... घंटा वाजायच्या आत मन स्वयंपाक घरात गेलेले असते नाही तर चाय अड्डावर पोहचलेले असते...कसं सुचत जात मस्तपैकी...चहाचा एकेक घोट घेता घेता....
संपला दिवस....पोहचलो घरी.... लेकाचे reporting....एक मस्त पडी.... आवराआवरी.....आणि उद्याची तयारी.....
अरे उठले की ....परत....पण काय .... सकाळचे सात वाजले...५.३० नाही....काही घाई नाही गडबड नाही.... एकदम निवांत ....अग, मन वेगाने धावत फेरफटका मारून आलेले आहे.... तू निवांत विश्रांती घे आत्ता.... तुझ्यानुसार चाल... इतके दिवस घड्याळाबरोबर पळत होतीस....


Saturday, 21 March 2020

मृत्यु दाराशी येता......

श्वासाचे गणित मांडूया ......
            अनेक msg चा धुमाकूळ...म्हणजे कोरोना जेवढ्या लवकर replicate होत नसेल त्यापेक्षा लवकर msg चा फॉर्म बदलत आहे. विनोद, विनंती, आवाहन, समज, दाखले, आदेश, स्वतःच ideal role होणे, स्वनिर्मिती  अशा एक ना अनेक स्वरुपात माणसाची प्रगल्भता दिसून येत आहे. कधी ना कधी मरण येणार.... प्रत्येकजण यासाठी so called mentally prepared असतो. अज्ञानात सुख असते. क्षण कोणता असेल माहित नाही. 
            आत्ताची परिस्थिती फक्त तो क्षण कदाचित हा असू शकतो ....असे सांगणारी आहे. हे वर्ष तसे असे क्षण अनेकदा दाखवून देणारे होते. पावसाळ्यातील पूर परिस्थिती असो, ऑस्ट्रेलिया मधील वणवा असो किंवा वूहान मध्ये जन्माला आलेला आणि सर्व जगाने पोसलेला हा कोरोना असो. हे क्षण वरचेवर आले आहेत आणि या क्षणामधून निभावलो तर पुढे असे अजून क्षण असतील. क्षण चुकणार नाहीये... सासऱ्यांनी सांगितलेली एक गोष्ट आहे .. गरुडाच्या पाठीवर एक मुंगी क्षण चुकवायला हिमालयात गेली होती. नंतर समजले तिचे मृत्यूचे स्थानच हिमालय होते. 
      तरीही लढा द्यायचा आहे. हतबलता स्वीकारायची नाहीये. सगळ्या शास्त्रज्ञाच्या मांदियाळीत मला डार्विन नेहमीच भावतो. कोणतेही आयुष्य जगत असा त्याची Theory of Natural Selection प्रत्येक ठिकाणी लागू. Struggle for existence and Survival of fittest. तावून सुलाखून जो निघतो तो सर्वोच्च पदी जातो आणि टिकतो. त्याची पिढी टिकते.
            सध्याची लढाई केवळ स्वतः टिकण्याची नाहीये तर पिढीला टिकविण्याची आहे. कथारूप वाटणारे आपले आईवडिलांचे अनुभव....७२ चा दुष्काळ पडला होता ना तेव्हा....किंवा चीन भारत युद्ध असो किंवा बांग्लादेश युद्ध असो त्यांचे अनुभव “आम्ही कसे दिवस काढले”....या tagline ने सूरू होतात आणि आपल्याला ते कथारूप वाटून आपण त्यात रमतो. आज ही tagline “आपल्याला असे दिवस काढायचे आहेत”..... या मध्ये रुपांतरीत झाली आहे. काही वर्षांनी नक्कीच ती कथारूप होईल पण ती कथा सांगायला आपण असू की नाही याची शाश्वती नाहीये....
            मज्जा अशी आहे की मरण हे परीक्षा घेत असते. यावेळेस दाराशी आलेले हे मरण थोडेसे विक्षिप्तपणे वागत आहे. मरणच ते थोडा विक्षिप्तपणा असणार.... मरणाचा लढा वगैरे बघून आता त्याला सुध्दा बहुतेक बोअर झाले आहे. त्याला आता मानवाचा त्रागा बघायची इच्छा नाहीये. ती धावपळ, ओढाताण, स्ट्रेस, हेवेदावे, हे सगळ बघून त्यालाच frustration आले आहे बहुतेक. म्हणून त्याने आ वासला आहे..... आई जशी मुलांना म्हणते ना एका जागी स्थिर बैस नाहीतर माझ्या इतकी वाईट नसेल.... मरण सध्या त्या फॉर्म मध्ये गेले आहे. म्हणत आहे की फक्त एका जागी शांत बस.....फक्त शांत बस.... त्याला सुध्दा कामातून जरा विश्रांती हवी आहे. accidents, वासना, स्ट्रेस, प्रदूषण कित्ती कित्ती कारण या मरणाची! सध्याची परिस्थिती बघून कोरोना शिवाय बाकीची मरणाची कारण होती की नाही कधी हा प्रश्न पडावा......
            LOCKDOWN ! काय lock down झाले आहे नेमकं? अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. बातम्यांमध्ये एक ओळ दिसते. फक्त जीवनावश्यक वस्तू सूरू राहतील.... जीवनावश्यक.... मग हाताच्या बोटावर मोजण्याइतकी दुकाने. तिथे सुद्धा आता १५ मिनिटापेक्षा जास्त नको थांबायला....काय आहे माझ्या जीवनासाठी आवश्यक ? हे शोधण्याचा हा सामुदायिक काळ.... कदाचित सगळ्यांना एकत्रितपणे आणि एकच उत्तर मिळाले तर उरलेले आयुष्य (अजूनही..आशानाम मनुष्याणां....)सुखकर होईल.
            आपलीच पिढी आहे जी ही कथा पुढच्या पिढीला सांगताना त्याला अध्यात्माची योग्य जोड देऊ शकेल. आज तंत्रज्ञान नसते तर ही जागृती करणेही सोप्पे नव्हते. त्यामुळे तंत्रज्ञानापासून दूर असलेले आज अनेकजण त्याचा वापर करून Social distancing मध्ये पण आपलेपणा शोधताना दिसत आहेत. आणि नेमके कशासाठी पळत आहोत याचा विचार सुध्दा करायला वेळ नसणारे आज जरा स्थिर होता येत आहे का किंवा आपल्याला सुध्दा स्थिर होता येऊ शकत या विचाराने अचंबित आहेत.
            जरा विसावू या वळणावर ...असं म्हणत असताना थोडा लेखाजोगा मांडू या का? मित्रमंडळीमध्ये आपण काय काय करत असतो, काय काय केले, कसं कसं करत आहोत, असं अगदी न थकता सांगत असतो. हा लेखाजोगा जरा स्वतःला सांगू या....खरंच डार्विनच्या सिद्धांतानुसार जगलो का मी .... जो जो काही struggle होता तो माझ्या अस्तित्वासाठी होता का .... काय राहून गेलं ...एक ब्रेक मिळाला आहे ..त्यात ते पूर करता येइल का? आत्तापर्यंत करत असलेलं सगळच निरर्थक का....की त्याचे या समाजात किती योगदान देता आले या सगळ्याचाच लेखाजोगा मांडू या.
            break हवा break हवा असं म्हणत असताना नवेनवे destination शोधत असतो. निसर्गाने आज कदाचित जाणीव करून दिली....तुझ घरपण एक destination आहे. तिथे सुद्धा नवरसाची विविध रूपे आहेत. त्यांना पण जरा अनुभव. आणि तू स्वतः या निसर्गाचा घटक आहेस. स्वतःला अनुभव. तुझ्यामधले सौंदर्य शोध. आणि ते फक्त स्वतःला सांग....
            मृत्यु दाराशी येता एवढा शांत संवाद तुझ्यामधील ईश्वराशी करता येत असेल तर त्याशिवाय दुसरं सुख काय..... भेटूच....या अशा कथा सांगायला...यया बद्धा प्रधावन्ति.......


Sunday, 8 March 2020

स्त्रीत्व की मनुष्यत्व ?

Hi….
जागतिक महिला दिनाच्या संध्येला....
भारी वाटतं ना ..आपल्याबद्दल कोणीतरी एवढं भरभरून लिहित आहे. कोणीतरी काय....सगळेचजण  अगदी सगळेचजण ...सगळ्यांच्या status ला स्त्री म्हणजे...मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व! सहनशील, त्यागी, प्रेम, वात्सल्य, झुळूक ....आई, बहीण, प्रेयसी, पत्नी .... एकेक साज चढत जातो. Being woman चे  एक सुंदर वलय निर्माण होऊ लागते. मग being woman की being human हा संघर्ष उगीचच मनात घोळू लागतो. कारण काहीच नाही... पण वाटू लागतं! वाटायला काय तसं काहीही वाटत !
Special treatment, special respect, द्या असं सांगायची गरज का निर्माण झाली असेल? निसर्गाच्या दोनच निर्मिती, कलाकृती  पुरुष आणि स्त्री. जगाच्या पाठीवर कोठेही जा .... पुरुष आणि स्त्री याच रचना बघायला मिळणार... तरिही स्त्रीची रचना, तिचं अस्तित्व जाणून घ्या हे सांगायची, नुसते सांगायची नाही तर त्यासाठी घाट घालण्याची गरज पडावी....टाहो फोडावा लागतो आमच्याकडे बघा.....त्यासाठी कामाची यादी द्यावी लागते आणि एवढेच नाही तर स्त्री पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगावे लागते... ही चढाओढ कशासाठी? एकाला सिद्ध करण्यासाठी दुसरा नेहमी दुसऱ्या स्तरावर का न्यावा लागतो? .... हा मला पडलेला साधा प्रश्न आहे...
मग हळूहळू उत्तर समजू लागते. स्त्रीचं अस्तित्व समजत नाही, लक्षात येत नाही असं नाही. तिचं अस्तित्व तिच्या बौद्धिक आणि मानसिक सामार्थ्यापेक्षा शारीरिक सामर्थ्याला जास्त प्राप्त आहे. नाजूकता, सौंदर्य, लज्जा, लोभस याचं वलय पूर्वापार तिच्या भोवती निर्माण झालेले आहे. सहनशील, त्यागी हे तिचे हातखंडे आहेत. कितीही वेळा आणि कधीही ती हे  करू शकते. ऐतिहासिक समाज या विचारांशी तद्रूप होता. काही कोष, काही विचार हे सोयीच्या राजकारणासारखे असतात. समजत असतं पण आम्हाला ते सोडायचे नसतात. सहज उपलब्ध असलेली  उपभोग्य अशी बाब कोणीही मनुष्य सहज सोडू शकणार नाही. तो एक मानवी स्वभाव आहे. त्यावर  प्रयत्नपूर्वक  काम करावे लागते. सध्या हा घाट प्रयत्नपूर्वक कामाचा आहे.
पण तरिही काही गोष्टी खटकत आहेत. मी स्त्री म्हणून मला ही सवलत हवी किंवा मला सहानुभूती दाखवा असा लेप या प्रयत्नास चढायला नको. सौंदर्य, नाजूकतेचे जे वलय झाले आहे ज्याच्या संरक्षणाची जबाबदारी may be ऐतिहासिक काळात पुरुषांनी उचलली होती आणि सरावाने ती मक्तेदारी झाली असावी. स्त्रीला आज हे पाश तोडायचे आहेत. 
केवळ माझ्यामध्ये हेच गुण नाहीत, तर वीरता, साहस, धैर्यशीलता, निर्णयक्षमता, उत्तरदायित्व, पराक्रम, सारासार विवेक बुद्धी हे गुणपण आहेत. आणि हे गुण केवळ स्वानंद मिळविण्यासाठी नाहीयेत. त्याचे सादरीकरण झाले तर सामाजिक दायित्व सुद्धा मी पेलू शकते.  आता मी या सादरीकरणासाठी सिद्ध होऊ पहात आहे. 
अर्रर..... पण या गुणांचा मालकी हक्क पुन्हा पूर्वापार पुरुषांकडे चालत आलेला. त्यामुळे या गुणांना साज पौरुषार्थाचा.... त्यामुळे हे गुण प्रकट करायचे की पुरुषांशी स्पर्धा हीच भूमिका आम्हाला समजेना.... आणि पुरुषांशी competition सूरू झाली. मग घरातील अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आर्थिक बाजू strong असणं गरजेचं आहे का ..ok ..मग मी आर्थिकदृष्ट्या सबल होणार... पण त्या बरोबरीने माझे वात्सल्यही कमी होता कामा नये....मग मी अस्तित्व आणि कुटुंब प्रेम हा झगडा माझ्याच पातळीवर निर्माण केला. डार्विन चा सिद्धांत मला खूप जवळचा वाटतो.... struggle for exsistence and Survival of fittest! स्त्री सुद्धा या सिद्धांताची शिकार झाली.... किंवा त्या नियमातून तिची सुटका नाही. स्त्रीत्व नाकारून पुरुषार्थ नको आहे तिला.... आणि केवळ स्त्रीत्व असेल तर तिचे  अस्तित्व नेहमी दुसऱ्या स्तरावरच गणले जाईल...किंवा गणना ही होणार नाही आणि ती गणना होण्याआधीच अस्तित्व संपुष्टात आणले जाईल हे दडपण आहे.
मग या सगळ्याचं combo pack मी Superwoman बनणार. स्त्रीत्व आणि पुरुषत्व माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. कधी सहज तर कधी जीवाचा आटापिटा करून... पुरुषार्थाचे वलय असलेले गुण माझ्यामध्ये आले तर आणि तरच माझा आत्मविश्वास प्रबळ ठरणार...नाहीतर माझे अस्तित्व पायदळी तुडवले जाणार... केवढी ही स्पर्धा.... 
आपण स्वरूप, व्याख्या यामध्ये अडकतो का? पुरुषांकडे सहनशक्ती, त्याग, सौंदर्य, वात्सल्य, कारुण्य नसते का? बापाचा जीव तीळतीळ तुटत नाही का? भावाचा हात नसेल तर बहीण पूर्ण होते का? पतीचे कर्तृत्व नसेल तर पत्नी सहज गृहलक्ष्मी होऊ शकते का? प्रियकराची उबदार मिठी नसेल तर स्त्री मधील प्रेयसी खुलू शकते का? स्त्रीत्वच्या प्रकटीकरण करण्यासाठी पुरुषार्थाच्या व्याख्येत अडकलेले हे गुण नाकारता येतील का?
स्त्रीत्व आणि पुरुषार्थ एकत्र आल्याशिवाय नवनिर्मिती होऊ शकत नाही. कोणाही एकाचे वर्चस्व किंवा प्राबल्य निसर्गाने बहाल केलेले नाहीये आणि ते त्याला मान्यही नाहीये. स्त्रीत्व आणि पुरुषार्थ समानता ही  मनुष्यत्व मध्ये विलीन केली जाऊ शकते का? HAPPY HUMAN DAY असू शकतो का? परस्परांना जाणणारा, ऐकणारा, सुनावणारा,  मानणारा, कदर करणारा, पूजन करणारा, असा सर्व गुणांनी परिपूर्ण असा पूरक गट निर्माण होऊ शकतो का? घरामधील, समाजामधील त्या व्यक्तीच्या भूमिकेला तिच्या स्त्री पुरुष असण्याच्या अपरोक्ष न्याय मिळू शकतो का? त्या व्यक्तीचा रोल profile लिंग निरपेक्ष असेल का? 
मनुष्यानुसार त्या गुणांचे प्राबल्य कमी अधिक असेल आणि ते असावे. तर आणि तरच पूरक गुणांची खाण असणाऱ्या व्यक्तीशी अद्वैत घडू शकते. 
हे अद्वैत घडता क्षणीच वर्चस्वाचे, सिद्ध करण्याचे, कपटाचे, छळाचे, अवहेलनेचे   सगळे खेळ संपुष्टात येतात.... आणि राहतो तो फक्त संवाद.... आत्म्याचा आत्म्याशी .... बुद्धिमान, सौंदर्यवान, भावनासंपन्न  मनुष्यत्वाचा ....
अशा संवादाची  वाट पहात आहे!

Sunday, 26 January 2020

अनघाईचे अमोघ वर्चस्व

       
याची देही याची डोळा.........

         खूप  दिवस लिखाणाची बैठक जमून येतच नव्हती. त्याबाबत रुखरुख होती. कारण मात्र उमगत नव्हते. आज मात्र कधी एकदा लिहायला घेत आहे असे होऊन गेले. त्याबरोबर कारणही उमगले... आयुष्यात sort of  भारी, remarkable अनुभव गाठीशी आले की या लेखनाला पर्याय नाही.
         मन वज्र हवे मनगट ते पोलाद....कधीही शांत बसले की ही ओळ मला नेहमी आठवते. फार आत्मीयता वाटते ह्या वाक्याविषयी. मनात खूप इच्छा आकांक्षा दाटून येतात. केलं पाहिजे असं काहीतरी...अशी यादी तयार होते आणि मग शरीर मध्येच एखादा break लावते आणि म्हणते जरा दमानं घ्या. मन सातासमुद्रापलीकडे गेलेलं असतं आणि त्याच्या धावण्याच्या वेगाबरोबर शरीर धावू शकलं नाही की कुठेतरी आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो. पण ...एखादा अनुभव असा घडतो की आपल्या आत्मविश्वासाला उभारी देतो... अनघाई च्या त्या घळीमध्ये हेच घडले.....
           २०१९-२० ची प्रबोधिनीत राबविली गेलेली दुर्गजागर मोहीम.दहा महिन्यात ३० किल्ले सर करण्याचा संकल्प सोडलेले इयत्ता सातवी ते नववीचे ४० सवंगडी आणि त्यांना संकल्पप्रत पोहचविणारे सेनापती ....असे सगळे जण संकल्प पूर्तीसाठी अनघाई गडावर जाणार होते. कठीण श्रेणीतील गड, खडकांचा बनलेला. रोपच्या सहाय्याने चढाई , शेवटच्या ट्रेकच्या पुर्ततेने मोहिम पूर्ण करण्याचं साकड असे कितीतरी छोटे छोटे घटक या ट्रेकशी जोडलेले होते. त्यात माझे या ट्रेक वर जाणे ठरले...दररोजचा (केवळ म्हणायला)जुजबी व्यायाम आणि सुदर्शन क्रिया एवढीच तयारी...स्वतःला टेस्ट करून घे असे आमच्या अहोंचे सांगणे....जमेल हा विश्वास....एवढ्यावर शाळेत पोहचले....
           ट्रेक चे सरसेनापती निलेश दादा गावडे यांना मला बघून नमस्कार करताना त्यांच्या मनात नव्याने calculation सूरू झाले असल्याचे लक्षात आले.(महाराष्ट्रातील सर्व ट्रेक करणारी, गड किल्ल्यांच्या प्रेमात असलेली ही व्यक्ती..... गाव सांगितले की डाव्या उजव्या बाजूंला कोणते गड याची चालती बोलती dictionary....गडांचा गूगल map...sorry गावडे map) शीतल ताईच्या चेहऱ्यावर समाधान..आज गप्पा होतील छान असे दोघींना वाटले... शीतल ताई म्हणजे दुर्गजागर ची शीतल दुर्गा.. सर्व ट्रेक हिरीरीने पूर्ण करणारी जिद्दी महिला पालक ....सर्व ट्रेक मधील सर्वांची आई ... सर्व ट्रेक अवघड म्हणून सागर माथाचे प्रशिक्षक सोबतीला ..... असा सर्व लवाजमा बरोबर घेऊन शिवराज दादांनी जय श्रीराम आरोळी दिली आणि प्रस्थान झाले...
          मी अजूनही संभ्रमात.....त्यात सागरमाथा चे समन्वयक प्रशांत पवार यांच्या गिर्यारोहणाच्या कामाविषयी मुलाखत सूरू झाली. नशा, वेड काय असते हे या जिप्सी लोकांमध्ये जाणवते...मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी गडाच्या टोकावर शेकडो वेळा जाण्याची तयारी दाखविणारी ही मंडळी... आणि आपण आज ३ round मारले आणि १२ मजले चढले म्हणून कौतुकाने स्टेप्स मोजणारी मंडळी...आपलीच आपल्याला जाणीव व्हावी....गावडे दादांना विचारले ...मी mentally किती आणि कशासाठी prepare होऊ.... ते मला म्हणाले ..ट्रेक पूर्ण होणार..करणार...(all)आल is well...म्हटले ok.
             माझा एकंदरच आविर्भाव बघून दादाने काळजीपोटी (केवळ दया येऊन) त्याचा shooter शौनक राउत मला दिला....'हा दिला आहे..ट्रेक पूर्ण झालाच पाहिजे'..शौनक नववीचा विद्यार्थी...वर्गात शिक्षक म्हणून गेलो की आपण विद्यार्थ्यांना धडा शिकवतो... शौनक काय चीज आहे हे मला काल समजले...त्याने मला ट्रेक शिकवला..त्याने मला सेवाभाव शिकवला...त्याने मला निसर्ग शिकवला. एकोणतीस किल्ल्यात गडी काय ताकदीचा मावळा झाला आहे हे मला उमगले. एवढी सोबत केल्यानंतर त्याचे एक वाक्य होते...आज मला माझ्या क्षमता समजल्या...

          वर्षभर मुलांबरोबर वर्गात असायचे...पण काल मुले माझ्याबरोबर होती. खूप मजा मस्ती, गप्पा....त्यांची तिथे धडा शिकण्याची तयारी ....मलाच भारी वाटत होती... एकेकाचे एकेक रंग दिसत होते.... मैत्री तर झालीच पण wavelength जुळली...जी healthy communicationसाठी सगळ्यात गरजेची असते...हे सगळं पदरी पाडत गड चढाई सुरूच होती...माझे नाव खेळगट (धन्यवाद तरस साहेब)....लिंबू टिंबू याअर्थी...शेंडेफळ झाले होते सर्वांचे... माझ्या speed ने जात होते, थांबत होते....पण हळूहळू लक्षात येऊ लागले की ससा कासवाच्या शर्यतीतील मी कासव होत आहे...मस्त मजा घेत होते...सरसेनापती रघु दादांना तर माझे नाव असे असे आहे असे आवर्जून सांगावे लागले...म्हटले उद्या शाळेत येऊन विचाराल नाहीतर खेळगट कुठे म्हणून..
           मुलांचा आता एकमेकांवर किती जीव जडला आहे हे जाणवत होते.
          सगळे सेनापती म्हणजे.... त्यांनी आज्ञा करावी आणि मुलांनी झेलावी... सेनापतींनी मावळे बनून राहण्याचा प्रयत्न करावा....मुलांची आईवडिलापेक्षा अधिक काळजी घ्यावी....प्रेरणा द्यावी.... मला मात्र मनोमन आधीचे किल्ले का  मिस केले याची जाणीव व्हावी..विचाराबरोबर पाऊले पडत होती...चैतन्याने परिपूर्ण भरलेली माणसे आजूबाजूला होती...सागरमाथा टीमला बघून तर ... अरे बाप लोकं! ज्या ठिकाणी रोप ची गरज त्या ठिकाणी ही लोक चटचट चढाई करून खुंटे ठोकणार...आपल्याला एकट्याला चढायचे tension..हे आपल्याला आपल्या सामानासकट उचलणार..तेही सुरक्षित...ग्रीप कुठे कुठे याचे नकाशे त्यांच्या मनात कोरलेले .... त्याच वाटेवरून दहा वेळा चढाई उतराई करणार...किती ते नियोजन...मधमाश्या उठतील ..उठल्या..पाच मिनिटे शांत राहा...जणू मधमाश्यांच्या नसनस से वाकीब...
          जसजसे चढण चढत होते तसतसे खेळगट आता पुढच्या इयत्तेत जात होता...विद्यार्थी शिक्षकांना प्रेरणा देतात... वर्गात यांची ऊर्जा बंदिस्त असते...रुसो, रवींद्रनाथ यांची शिक्षण प्रणाली डोळ्यासमोर दिसत होती...मुलांना निसर्गाच्या सानिध्यात सोडा ..निसर्ग त्यांना घडवेल..विद्यार्थी अनुभवल्याच समाधान मनात कोरले गेले होते. मिश्किली करणारा ध्रुव, धड्यामधील शंका तिथे विचारणारे कैवल्य,सुयश, शार्दुल , मिस मला रडायला येत नाही पण भरून येत आहे असे म्हणणारी सिद्धी, कितीही थांब म्हटले तरी रडायचे न थांबू शकणारी प्रांजल, मानसी, आभा, मृदुला, सतत पडणारी आणि सगळ्याचे चिडविण्याची जागा असणारी तनिष्का कोणाकोणाला आठवू... कशाला आठवू ..माझे झाले आता सगळे.. मजा येइल आता ...
        बरं...... यादरम्यान अजून चढाई चालूच आहे बर का.... आणि तो ८०  अंशाचा खडक आला...आणि मुलांना साधा ८० अंशाचा कोन काढता येत नाही का हे म्हणणे निरर्थक वाटू  लागले... मुलांना ८० अंशाचा कोन, खडक सहज चढता येत होता...वरती जाऊन काय करायचे ? बघायला काही नाही ... म्हटले गप इथे बसा..चढू शकलो तरी..उतरायचे आहे हे विसरून चालणार नाही...पण एकटे खाली रहायचे म्हणजे नुकताच सापाचा सुंदर photo पाहिला असल्याचे लक्षात आले आणि म्हटले असे ही मरायचे आणि तसे ही...तो कुछ तुफानी करते है! आणि ८० अंशाचा खडक चढले...वरती पोहचले आणि गावडे दादा आणि रघु दादांना नमस्कार केला. त्यांचे उत्तर घरी पोहचल्याशिवाय ट्रेक पूर्ण होत नसतो... आमचे ११ नियम आहेत. "धन्य" म्हणाले!


         संकल्पपूर्तीनिमित्त गडाच्या साक्षीने मुलांना ढोल गजराच्या आवाजात उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. याचा सगळा पाठपुरावा सतीश पवार साहेबांचा ...एकेक भन्नाट कल्पना सुचणारे मोहरे या निमित्ताने भेटले...  बाजूने सह्याद्रीच्या रांगा... केवळ नतमस्तक... काहीच नाही आपण ...काहीच नाही....ह्या महाराष्ट्रात सह्याद्रीचे बिनदिक्कत वर्चस्व .... पुण्यातील सुभेदारी जणू अनघाईकडे असावी असा त्याचा रुबाब...सौंदर्य तरी किती असावे... अजिबात हिरवाई नाही... दोन चार पूर्णपणे पर्णहीन झाडे रुबाबात उभी असावी...सेल्फीप्रेमीसाठी सेल्फी spot करून...

        चला आता परतीचा प्रवास... तीच सोबत...पण गवसणी घातल्याचे समाधान...त्या निसर्गाला धन्यवाद म्हणून आलो तरी त्याच्या ऋणातून उतराई न होण्याची जाणीव...खूप श्वास भरून घेतला... खूप श्वास.... जमेल म्हणत असतानाचा भूतकाळ आणि जमलेच चा वर्तमान transition phase दाखवत होता.. चढाई पेक्षा उतरण अवघड होती... पण सोबत तिथे भरून घेतलेला श्वास होता... सगळ्यांचे शेंडेफळ होते म्हणून Z PLUS सुरक्षा होती. म्हणून तेही जमलेच... बोटे मी मी म्हणत होती. २६ जानेवारीची ध्वजारोहण वेळ दिसत होती....काय करायचे.... आल is well म्हणायचे.... गरम पाण्याची कुंडे मदतीला धावून आली... त्या डुबकीने मी ट्रेक केला की नाही हेच शरीराला विसरायला लावले आणि पूर्वीची स्मिता दिली....चमत्कार निसर्गातच घडतात...सगळ्याच्या मनापासून मिळणाऱ्या शुभेच्छा गाठीशी असल्याकी असे आनंदाचे क्षण आयुष्यात निर्माण होतात....याची देही याची डोळा त्याचे साक्षात्कार मिळतात....
          शेवटचा टप्पा आता...सर्वजण रडवेले झाले.. तीस ट्रेक मध्ये हसवणारे डाके साहेब असे रडवू कसे शकतात? पण दादाने दिलेल्या या अनुभवामधून , या मित्रामधून दूर जाणे त्यांना जमतच नव्हते..सगळ्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. जणू काही त्या सह्याद्रीचे पायच धुतले..
        शाळेत आल्यानंतर मुलांच्या पालकांनी केलेलं स्वागत, आपलं बाळ लढाई करून आलेलं नाही तर आता लढाईसाठी सिद्ध झाल्याच समाधान आणि शिवराज दादाला त्यांच सांगण की, 'याची उतराई कशी करू?' हे सगळच कल्पनातीत होत. याची देही याची डोळा किती ते साठवावं... फक्त आणि फक्त नतमस्तक व्हावं.. धन्यवाद म्हणावं...