Sunday, 10 November 2019

IISER च्या प्रांगणातून......

ll श्री ll

प्रति,
            IISER TEAM,
            सप्रेम नमस्कार.     
            IISER PUNE आणि TATA TECHNOLOGIES या दोन्ही मातब्बर संस्थांनी सामाजिक भान लक्षात घेऊन एकत्र येऊन STEP FOR STEM – Through Hands on activities असा पुणे जिल्ह्यातील २०० शिक्षकांसाठी  १० कार्यशाळा असणारा वर्षभर कार्यरत राहणारा एक कार्यक्रम आरेखित केला. पुढची पिढी सक्षम करायची असेल तर त्यांची बौद्धिक क्षमता आणि कौशल्य क्षमता वाढविणे गरजेचे आहे. मग या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी सर्वोत्तम दुवा म्हणजे शिक्षक.
            शिक्षक हा समाजातील असा घटक आहे की, जो त्याच्या कार्यक्षेत्रात दररोज नवीन अनुभव घेत असतो आणि नवीन आव्हाने पेलत असतो. कारण त्याचा प्रत्यक्ष संबंध जिवंत माणसाशी येत असतो; ते सुद्धा त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक घडणीच्या काळात. शिक्षकाची जीवनधाटणी कळत नकळतपणे विद्यार्थ्याच्या आयुष्यात उल्लेखनीयपणे कोरली जात असते. शिक्षकाकडे नेहमीच देण्याची वृत्ती असते. या दोन्ही संस्थांनी समाजामधील हाच घटक हेरला - जो सक्षम झाला तर निःस्वार्थपणे समाजाला सक्षम करेन.
            IISER आणि टाटा TECHNOLOGIES तुमच्या या विचार शक्तीला सलाम! या विचाराने प्रेरित होऊन तुम्ही जिल्ह्यामधील १०० शाळांपर्यंत पोहचला. तुमची भूमिका मांडली आणि त्यांचे २०० शिक्षक तुमच्यापर्यंत दर महिन्याला तेवढ्याच उत्साहाने येतील आणि तेवढ्याच उत्साहाने टिकतील सुद्धा याची पूर्ण जय्यत तयारी, तजवीज तुम्ही करून ठेवली. १८ जानेवारी २०१९ रोजी ह्याची मुहूर्तमेढ झाली आणि पूर्ण रिकामा दिसत असलेला white board जेव्हा spray फिरवताच STEP FOR STEM  ने भरुन जातो तेव्हा इथे काहीतरी नक्कीच नवीन मिळणार आहे याचे कुतूहल  आणि आपल्या प्राचार्यांनी या कार्यशाळेसाठी आपली निवड केली या जबाबदारीचे भान अशा दोन्ही बाबी मनात जागृत झाल्या होत्या.  
            उद्घाटन सोहळा तर पार पडला. आता खरी कसरत सुरू झाली होती. त्यासाठी पुढे सरसावली अशोक रूपनेर सरांची टीम. शिल्पा जैन, चैतन्य, श्रध्दा, नेहा, कर्णीका, प्रज्ञा, अंकीश  असे सगळेच बेस्ट फलंदाज.....Devotee.... Pure Science मधील masters...... एखादा topic शिकवताना तो किती खोलवर विचार करून शिकवला पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही पूर्ण टीम. आणि तो त्या टोकापर्यंत शिकवायचा जोपर्यंत या समोरच्या शिक्षकांना समजत नाहीये. Yes..... मी बरोबर बोलले. शिक्षकांना समजत नाहीये. अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा डोलारा माथी असणारा, अनेक शासकीय कामात गुंतलेला शिक्षक अद्ययावत होणे ही काळाची गरज आहे. कारण शिक्षक ८०-९० च्या अभ्यासक्रमात घडलेला आहे.  आता त्याच्यासमोर येणारा विद्यार्थी २१ व्या शतकातील आहे.  जो जन्मतःच मोबाईल आणि टॅब वापरत आहे. ते ही कोणीही न शिकवता... शिक्षक विद्यार्थ्यांमधील ही तंत्रज्ञानाची, वैचारिक दृष्टिकोनाची दरी दूर करण्याचे काम IISER च्या टीमने चोख बजावले आणि लीलया पार पाडले. तुमची मेहनत, पूर्वतयारी दिसत होती. एखादा प्रयोग होत नसेल तर त्यांच्या तोंडून सहज येत होते अरे, काल तर झाले होते..... प्रत्येक गटासाठी बॅचसाठी तुम्ही त्याच आस्थेने तयारी करत होता. कारण तुमच्या नजरेसमोर उद्याचा समाज उभा होता. बरे हे सगळे शिकवणे अगदीच हसत खेळत....... अशोक सरांची टीम जरी काही शिकवत असली तरी अशोक सरांच्या चेहऱ्यावरची काळजी दिसत असायची.. सगळे मुद्दे पूर्ण होत आहेत ना..... आणि हा मुद्दा मीच समजवायला पाहिजे या आस्थेने ते त्या मुद्द्यावर activity विषयी बोलणे सुरू करायचे. पूर्ण वेळसुद्धा ते उभे राहून असायचे. चैतन्य, श्रद्धा आमच्या साठी विद्यार्थ्यांसारखे... पण आदरपूर्वक सहज आम्हाला नियंत्रित करायचे.  Pre test post test मध्ये तर बिचाऱ्यांची दमछाक केली असेल आम्ही. मूल्यमापन करताना Plickers हाताळण्याचे प्रशिक्षण, आमची उत्तरे बघून आजचे सत्र यशस्वी झाले की नाही याचा अंदाज घेणाऱ्या तुमच्या नजरा, तुमची अस्वस्थता सारे सारे लक्षात येत होते.  तुम्ही So called home work देत होता  आणि आम्ही आज ना उद्या नक्की हा अभ्यास पूर्ण करू असा विश्वास बाळगत होता. दहा वेळा विचारा दहा वेळा तुम्हाला ते त्याच पोटतिडकीने सांगणार.......  १५-२० वर्षे वर्गात शिकविलेल्या शिक्षकांना टाचण  कसे काढायचे आणि वर्गातील मुलांवर नियंत्रण कसे आणायचे , वर्गात शिकविताना वर्गाची रचना कशी असावी हा पाठ सांगायचा म्हणजे खरेच एक आव्हान होते. कारण शिक्षकांना नवीन देणे आणि ते त्यांना पटणे, त्यावर त्यांनी आमअंमलबजावणी करणे गरजेचे होते. हे आव्हान नेहा आणि कर्निका ने सहज पेलले. सगळ्यात मजा म्हणजे लँग्वेज.... भाषा कोणती वापरायची...... अगदी पहिल्या कार्यशाळेत मराठी भाषेतून शिकविणे ही केलेली मागणी नेहाला translator  रोल देऊन गेली आणि आमच्यामधील अनेक शिक्षकांना इंग्लिशमध्ये समृद्ध करून गेली. शिल्पा मॅडम चे administrative सूचना देणे, आमचे फोटो काढण्यात busy असलेल्या प्रज्ञा मॅडम , हे सगळे आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवले आहे.
            आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे content...आशय समृद्धता.......प्रत्येक शिक्षक त्याच्या पोतडीत नवीन शोध लागल्यासारखा 'युरेका युरेका' म्हणत होता. कारण श्रीमती इंद्राणी बालन या हॉल मध्ये तुमच्या भोवताली विज्ञान क्षेत्रात काय काय घडत आहे याचे प्रारूप आणून ठेवले जात होते. आमच्या समोर आणले गेलेले शास्त्रज्ञ अगदी विचारपूर्वक निवडलेले होतेहे लोक विषयाचा किती सखोल आणि सविस्तर विचार करतात ह्याचा जवळून अनुभव घेता आला. साधी राहणी आणि उच्च विचासरणी असे प्रत्येक शास्त्रज्ञाचे वर्णन करता येईल. विषयाच्या कळसाला गवसणी घालणारा शास्त्रज्ञ पाय जमिनीवर ठेवून असतो म्हणजे नेमका कसा असतो याचे उदाहरण म्हणजे आमच्याशी संवाद साधायला आलेले शास्त्रज्ञ....झोकून देऊन काम करणारे सगळेच वल्ली....... वेड भिनल्याशिवाय खरेच इप्सित साध्य होत नाही. आणि प्रत्येकाची नवीन पिढीसाठी असणारी तळमळ तेवढीच तीव्र.....हीच तळमळ आमच्या मध्ये जागविण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
            डेव्हिड सरांनी story telling हे  कसे कौशल्य आहे आणि logically ते अध्यापन तंत्र म्हणून कसे वापरता येते  याची ओळख करून दिली आणि आम्ही कार्यशाळेत रुळण्यास मदत झाली. शिक्षकीपणा सोडून विद्यार्थ्याच्या भूमिकेत किती मजा असते हे आम्ही इथे जगलो. एवढ्या activity केल्या की सगळ्यांच्या मनात मला ही activity करायला कधी बोलवणार असा प्रश्न हमखास येत होता. पक्ष्याची शिट्टी वाजवून ध्वनी हा धडा शिकताना तर पूर्ण IISER टीमला आम्हाला आवरणे कठीण होऊन बसले होते. मग ONE TWO म्हटल्यावर EYES ON YOU म्हणत आम्ही so called शांत व्हायचो. Housie हा मुलांचा किंवा किटी पार्टी मध्ये खेळला जाणारा खेळ, आय के राणा सारखे शास्त्रज्ञ गणिती प्रक्रिया शिकविण्यासाठी वापरतात हे पाहून त्यांच्या बुद्धिमत्तेला सलाम केल्याशिवाय रहावत नाही. Integers.... पळता भुई थोडी ......असा हा धडा Hot balloon वापरून हलकेच आम्हाला तरंगत ठेवणाऱ्या मंजुश्री धुमे, संस्कृतमध्ये असणारा विज्ञानाचा उगम दाखवणारे नेमके संस्कृतचे अभ्यासक की विज्ञानाचे शास्त्रज्ञ असे डॉ. रामकृष्ण भट, कॅमेरा वापरून रेकॉर्डिंगचे प्रशिक्षण देणारे विवेक सरप्राण्यांच्या आयुष्यामध्ये पण गूढ रहस्य असते याची जाणीव करून देणारे निशिकांत सुभेदार, IISER चे सर्वेसर्वा अरविंद नातू सर, भौतिक शास्त्रातील संकल्पना समजाविणारे चक्रदेव सर , चांद्रयान टीम चे सदस्य स्रीजिथ सर, उष्णतेच्यामागचे गमक दैनंदिन अनुभवातून मांडणारे भास बापट सर अशा सर्वांनी बालन हॉल मध्ये विज्ञानाची व्याप्ती आमच्यासमोर व्यापक स्वरूपात ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्या हॉलच्या बाहेर जाऊन IUCAA भेट, मुक्तांगण भेट, IISER दर्शन , अगस्त्य संस्थेचे विज्ञानाविषयी काम अशी अनेक दालने आमच्यासमोर खुली करण्यात आली. अपेक्षा फक्त एकच आम्ही ही व्याप्ती अनुभवावी आणि ती आमच्या वर्गात अजून व्यापक करण्याचा आणि त्यात या चिमुरड्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करावा.
            बौद्धिक तृप्ती समवेत अगदी भोजन तृप्तीदेखील तेवढीच प्रबळपणे पूर्ण करण्यात आली. म्हणजे कशातच तडजोड नाही. सगळच भरघोसपणे भरभरून देणे. IISER ट्रेनिंग ला जाणार कळले की विद्यार्थी विचारायचे आज नवीन कोणते मॉडेल आणणार? फुग्यांपासून ते लेझर पेनपर्यंत प्रत्येकाची एक पेटी तयार झाली आहे ....फुग्यांच्या सहाय्याने तर किती वैज्ञानिक तत्त्व समजतात याची पानभर यादी तयार होईल.  ही विज्ञानातील कुतूहल वाढविण्यासाठी आणि शमविण्यासाठी समृद्ध आहे. इथे प्रत्येकाला किमान १० मित्रांची साथ मिळाली. IISER च्या strong गटाचा support मिळाला. कधीही फोन करून प्रश्न, शंका विचारा, त्यांच्याकडून कर्तव्य भावनेतून त्याची पूर्तता होते.
            एकच विश्वास देतो आमची झोळी समृद्ध झालेली आहे. इथे आम्हाला दिशा मिळाली, नजर मिळाली, इथे आलेला शिक्षक आता केवळ अभ्यासक्रमपूर्ततेसाठी शिकवणार नाही. त्याला मिळालेल्या पोटलीतून तो वर्गात विज्ञानाचे विश्व निर्माण करण्याचा सजग प्रयत्न नक्की करेल.  आता 'आभारी आहोत'  हे  म्हणणे आमच्या कृतीतून दाखवून देऊ.
धन्यवाद!!
                                                                                                                                                            बॅच A
STEP FOR STEM


(शब्दांकन : सौ. स्मिता प्रवीण माने , JPNV निगडी)


Wednesday, 6 March 2019

विहंगमाचे भव्य थवे.....

विहंगमाचे भव्य थवे...

प्रबोधिनीत काम करणे आणि त्यातही पूर्व माध्यमिक विभागात काम करणे म्हणजे आयुष्य happening असते म्हणजे नेमके काय असते याचा पुरेपूर अनुभव घेत आहे.
सायकल सहल , किल्ले दर्शन, heritage walk,विज्ञान दिन, अभिव्यक्ती सादरीकरण , ज्यात नाट्य, संगीत यांचा संगम असं बरंच काही माझ्या आजूबाजूला घडत असतंं आणि उत्तम श्रोत्याच्या भूमिकेत जात, मी त्या सर्व बाबींचे, घटनांचे वृत्त कानात साठवत जाते.
 भारी! हे मुलांना अनुभवायला मिळत आहे; तेही एकाच शैक्षणिक वर्षात याचे समाधान, त्यामागे असणाऱ्या व्यवस्थापनाविषयीचा अभिमान आणि उत्तम गटकार्याचा आनंद ...हे सगळेच पाहूणंं  साठवत आहे.
पण नशीब जरा अजून बलवत्तर....अनुभूती  घेण्याची पण संधी मिळाली.
निमित्त 'पक्षी निरीक्षण'....
आयुष्यात MSc Zoology केले खरे, पण...college lifeच्या पक्षी निरीक्षणाव्यतिरिक्त खरे पक्षी निरीक्षण करण्याचा हा अनुभव काही गाठीस बांधता आला नाही.
चिमणी भुर्र... कावळा भुर्र.... कोकीळ भुर्र....बुलबुल आणि साळुंकी यांना खेळात भुर्र केल्यानंतर आता कोणाला बोलावयाचे असा मोठा प्रश्न माझ्या पुढे नेहमी उभा राहायचा....आवाजामुळे गानकोकिळा ही उपहासात्मक बिरुदावली आणि पु. लं.चे किमान दहा वेळा ऐकलेले  'पाळीव प्राणी' मधील 'पक्षी वर्णन' या व्यतिरिक्त ह्या झोळीत काहीच नव्हते. 
पण शिवराजदादाच्या, भिगवण येथे वास्तव्यास आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांना जरा भेट देऊन येऊ या आग्रहामुळे पक्षी निरीक्षण कशाशी खातात हे नेमकेपणाने समजले. 
बर ..तसा हा अध्याय फक्त फ्लेमिंगो पक्षी बघणे इथपर्यंत मर्यादित रहात नाही.
तर हा अध्याय म्हणजे अभ्याससहलोध्याय:!
आमचे 'श्रीभगवान' म्हणजे 'शिवराजदादा उवाच'....
'अभ्यास सहलीची एक प्रणाली असते....' 
मी 'अर्जुन'....जरा जास्त होईल....त्या युद्धाच्या वेळी अनेक उपस्थित सैनिकांपैकी एक.....ही प्रणाली समजून घेण्याच्या तयारीत....
पहिली दशा...पूर्वतयारी तांत्रिक पण आणि मानसिक पण....तांत्रिक तयारी  माहिती असते, पण मानसिक तयारी म्हणजे विद्यार्थ्यांना या सहलीत नेमके काय करायचे आहे याचे प्रशिक्षण देणे. मुलांचा focus प्रयत्नपूर्वक विस्तृत आणि एकाग्र बनविणे.
सहलीची तारीख ३ मार्च २०१९, आदल्या दिवशी पर्यावरणतज्ञ, नेहमीच शाळेच्या हाकेला 'ओ' देणारे श्री. उमेश वाघेला यांचे व्याख्यान. 'amazing birds' या विषयावर....
पहिलीच slide पक्षी कोणाला म्हणायचे?...आणि सहावीची मुले 'ज्ञानरचनावाद' या संकल्पनेच्या आधारावर पक्ष्यांची व्याख्या करू लागले....अरे इतके दिवस 'आकाशात उडणारा पक्षी' इथपर्यंत सीमित  असलेली माहिती, दोन पायांचा, पंख असणारा, अंडज, उष्ण रक्ताचा, पाठीचा कणा असणारा तो पक्षी ह्या व्याख्येपर्यंत येऊन पोहोचली. निसर्गाच्या सहाय्याने विज्ञान एवढे मनोरंजकरित्या पोहचवता येते हा या process मध्ये मला मिळालेला धडा...
मग एकामागून एक, रंगीबेरंगी, लहान, मोठा आकार असलेली, चोचीचे तर तुफान आकार आणि प्रकार असलेले पक्षी मुलांच्या उत्साहाबरोबर, कुतुहलाबरोबर एका मागून एक प्रोजेक्टरवर सरकू लागले. व्यवसायाने  architect असलेले उमेश सर पक्ष्यांची रंगसंगती आणि रचना, त्यामागचे कारण सांगण्यात इतके हरखून गेले  होते की पक्षी निरीक्षण सहल आजच झाली की काय असा अनुभव मला नक्कीच आला.
दुसरी दशा...तांत्रिकता...मी हा अनुभव पण पहिल्यांदाच घेत होते. अनुमती पत्र घेणे, विद्यार्थी यादी, परवानगी पत्र, प्रथमोपचार पेटी हे नेहमीचे झाले. त्यात additional touch जाणवला जेव्हा शिवराजदादाने त्यासाठी खास घेतलेली दुर्बीण आणि पक्षी निरीक्षण विषयाशी संबंधित पुस्तके घेतली....मी जरा दोन मिनिट स्तब्ध झाले....४० मुले आता कसली पुस्तके वाचणार? असो....
बरोबर शंभूसर आणि दादाच्या बरोबर अनेक सहलींना उपस्थिती नोंदवण्यात धन्यता मानणारी वृषाली....हक्काची एकदम....सवयीप्रमाणे सगळ्यांंसाठी डबा घेऊन आली होती. फोटो session छंद असावा असे जाणवावे एवढे छान photo काढले.
अभिषेकला बरोबर घेतलेच होते...आमचे राजे सुद्धा दुर्बीण वगैरे घेऊन जय्यत तयारीत दिसले. त्याचा उत्साह बघून hushh.... झाले. आपण आई बरोबर नाही ही सूचना त्यांच्यासाठी होतीच ....
तिसरी दशा....उपस्थिती नोंदवून झाली आणि माझ्या सहावीच्या चिमण्या गाडीत बसू लागल्या....मुलांना कोणताच पक्षी सूट होईना उपमा देण्यास... त्यामुळे जरा आवरते घेते...
भिगवण....करमाळ्याच्या जवळ....माहेरचा रस्ता धरला त्याचा थोडासा वेगळाच आनंद..एक पुसटशी किनार...ही किनार आईच्या आलेल्या फोनमुळे जरा गडद झाली ...
आमच्या फौजेपैकी पक्षिमित्र कोण ? याचे उत्तर म्हणजे म्हात्रे पुलाच्या इथे आम्हाला  येऊन मिळालेले किरण पुरंदरे....संजय दृष्टी लाभलेले ....संजय उवाच या भूमिकेत....त्यांची गाडीतील entry म्हणजे आधी tripod stand आले...त्यांच्या मागून गोलाकार टोपी घातलेले, हातात Spotting Scope ची bag घेतलेले....गेली ४० वर्षे हे काम करत आहे असे सांगताना स्वतः मात्र चाळीशीचे वाटणारे असे गृहस्थ....त्यांचे  पहिलेच वाक्य...मला 'किका'....म्हणजे किरण काका  म्हणा. 'किका ' जणू काही एका पक्ष्याचेच नाव....'त्याला पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोहे!' असे त्या क्षणी नक्कीच वाटले आणि त्यावर शिक्कामोर्तब झाला तो म्हणजे त्यांची दाहीदिशा स्वछंदपणे फिरणारी sign बघून....स्वाक्षरी खरेच माणसाचे रूप सांगते हे मिथ्या नव्हे....
मुलांच्या आपापसातील गप्पा आता पक्षी मित्र किका बरोबर सूरू झाल्या.... आणि मग -४०  डिग्री ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत आढळणारे, माउंट everest च्या उंचीवरून विहार करणारे, वेगवेगळ्या देशात असणारे, आणि सगळ्यात लहान ते सगळ्यात महान अशा सर्व पक्ष्यांची आमच्या गाडीत नव्याने entry झाली. By that time दादाने आणलेली पुस्तके मुलांनी अतिशय समरसतेने चाळली आणि मला खोटे ठरवले गेले. स्थलांतर म्हणजे काय हे तर विद्यार्थी विसरूच शकणार नाहीत.
चौथी दशा....त्यांची शोधक नजर तळ्याचा काठ शोधत होती....चेहऱ्यावरील हावभाव म्हणजे असे की आजही, ते, तो पक्षी किती कुतूहलाने पहात आहेत आणि अभ्यासपूर्वक माहिती देत आहेत याचे साक्षीदार होते. त्यांचे विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने पुढे घेऊन जाणे, आवाज करू नका सांगणे....४० मुलांना Spotting scope मध्ये बघताना तेच वर्णन ४० वेळा न थकता सांगणे. हे सगळेच एका devotee चे लक्षण होते....



पक्ष्याचा काळापांढरा रंग सुद्धा किती आकर्षक वाटू शकतो हे या event मध्येच कळते. चक्रवाक चा पिवळा रंग, पिवळा धमक म्हणायचा, की सूर्याचा पिवळा, केशरी की त्यांचे एकत्रीकरण, की आंबा म्हणायचा....आंबा रंग म्हणताना पण पायरी, की हापूस....शोधकाची नजर, प्रश्न पडल्याखेरीज perfection गाठू शकत नाही हेच खरे....
पाटसच्या तलावालगत आमचा पहिला तळ पडला....आणि पहिला टिपला गेला तो हा चक्रवाक....
पहिल्याचेच एवढे dissection, analysis...खूप वर्षांनी असा विज्ञान तास नजर आणि कान तयार ठेऊन attend केला.
माणसाच्या स्वभावाचे मला खरंच अप्रूप वाटते....टिटवीचे ओरडणे ऐकून दार बंद करून घेणाऱ्या माणसांच्या राज्यातले आपण! पण या सहलीत मात्र तिच्या आवाजाचा वेध घेत तिची लाल चोच बघण्यासाठी दहा वेळा तिच्याकडे नजरेला नजर देत होतो....डोंबारी, पिपेट, त्यांच्या जोड्या सांगताना तर चिमणीच्या आकाराचे हे पक्षी....इटुुकले पिटुकले उड्या मारत होते...काय काय वर्णन करावे, नदीसुरय ची पंखांची फडफड करत नदीत सूर मारणे, शेकाट्याचे लांब लांब गुलाबीसर पाय, चक्रांगाची चोच, रेड ibis च्या माथ्यावरचा कुंकवाचा टिळा, पंकजची लांब चोच, इवल्याशा कवड्या गप्पीचा काळाभडक तरिही आकर्षक रंग, Black beauty म्हणून आमच्या गप्पात गौरविलेला काळा शराटी, शेपटीवर उलट्या आकाराचा V असलेला कोतवाल, अडकित्ता आकाराची चोच असलेला अडकित्ता, विचित्र आवाज करणारे गलचा थवा, पाखुर्डी, मत्स्य गरुड, स्वतःची शेपूट लयबद्ध हलविणारा ससाणा सारखा दिसणारा कापशी, आपल्याला locate करायला आलेल्या पाहुण्यांना हुलकावणी देणारा, खरंच वेडा म्हणावे असे वाटणारा, रंगीत मुखाचा वेडा राघू, की मला बघायला आले आहेत तर आता त्यांनी माझे portrait काढावे या आशेने सुमारे अर्धा तास निश्चल राहिलेला नकल्या खाटिक.....कोणाकोणाचे आणि किती वर्णन करू....
माझ्या चिमणी भुर्र च्या खेळात आज अनेक नव्या सवंगड्यांची भर पडली होती.....
अहो ..पण हा घाट ज्यासाठी घातला तो फ्लेमिंगो....अहो तो तर मानाचा....त्याचे स्थान वेगळे.... त्याचा रुबाब वेगळा...त्याची लय, गती....सारेच निराळे....आपल्याला भेटायला आलेले आहेत हे प्रवासी....त्यांना निराश नाही करायचे....
त्यांच्या लकबी अशा आणि त्या वर्णन करणारे आमचे किका...म्हणजे हा पांढराशुभ्र फ्लेमिंगो, गुलाबी पायांचा, एकाच पायावर ऐटीत उभा राहिलेला, प्रत्येक काठाशी, छोट्या छोट्या बेटावर आपल्या थव्यात असणारे, काही पोहणारे, काही चालणारे, किका च्या भाषेत परेड....काही विहार करणारे....विहार तर कसा....अगदी सरळ रेषा ओढावी अशी शरीराची ठेवण, चोचीपासून शेपटापर्यंत, बांधा आखूड, आणि एका लयीत पंखांची  फडफड....बघा माझे रूप...या पंखांवरील तपकिरी रंगाची नक्षी आणि त्याखालील गुलाबी रंगाचा पट्टा....अहाहा! आणि या रुपात माझे आकाशाकडे झेप घेणे आणि जमिनीवर उतरणे....छे! 'अवतरणे'....
माझ्या मानेची स्थिती तर....ती जेव्हा पाण्याच्या आत जाई तेव्हा बघणाऱ्याला पाण्याचा स्पर्श होत आहे की काय असा अनुभव मिळावा.....माझी मान मी पाठीवर टाकून कशी विश्रांती घेत असतो हे सांगताना तर किका almost त्यांची मान आता पाठीवर टाकत आहेत की काय असे वाटले....(एवढे किका चे त्या फ्लेमिंगो शी तादात्म्य घडून आलेले.)..hope so आज तुमचा दिवस स्वच्छंद ठरला....मी तुम्हाला निराश नाही केले असेच तो फ्लेमिंगो जणू सांगत होता....
माझ्या चिमण्यांना देखील त्यांची पिसे मिळाली.....पक्ष्यांचे अप्रूप मुलांच्या डोळ्यात उतरले होते. 
जेवणंं झाली होती....उनही होते....हातात लेखणी आणि कागद, पक्ष्यांचे वर्णन पटापट लिहून घेण्यासाठी आत्मसात केलेली चौकस बुद्धी, थोडासा शीण, तहानेने घशाला पडलेली कोरड....आणि पक्ष्यांशी होणारी नजरभेट यात ही मुले श्रांत झाली होती. पण फ्लेमिंगो ४०००० किमी जातात हे माहित असल्यामुळे हे विद्यार्थी यावेळेस तक्रारीच्या सुरात नव्हते.....पाटातून वाहणाऱ्या थंडगार पाण्याने प्रत्येकाच्या जीवाला जरा विश्रांत केले. 
प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पातळीवर स्थिरावला गेला......हे स्थिरावणे नवीन भरारी घेण्यासाठी साठवून ठेवले गेले....
सहल माझ्या दृष्टीने सफल झाली होती...
पण पुन्हा श्रीभगवान उवाच.....उजळणी नाही झाली तर....ह्यापैकी झोळीत किती पडणार....मग घेतली प्रश्नमंजुषा....पूर्वतयारी पासून ते शेवटचा पक्षी इथपर्यंत प्रश्नावली instant ready.....पाठपुरावा करणे यासी ऐसे नाव......
एक प्रत्यक्ष साक्षीदार, जबाबदारी मिळालेला सदस्य, विज्ञान शिक्षक, सहप्रवासी, विद्यार्थी अशा अनेक भूमिकांमधून या सहलीत उपस्थिती नोंदविली आणि सरतेशेवटी या अध्यायातून आमचा आशय समृद्ध झाला.....आता पक्षी उडताना बघताना माझी नजर त्याच्या असण्याचा नक्कीच वेध घेईल .....
श्री विहन्गार्पणमस्तु!!!

स्मिता प्रवीण माने 
अध्यापिका
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र