आता हे काय मध्येच? असे नक्की वाटेल. पण विचारांचा भुंगा. कसा कोठून डोक्यात शिरतो, दोन चार दिवस जरा मुक्काम करतो, पाहुणचार आपल्या आवाक्यातील आहे, किंवा विषय जिव्हाळ्याचा असला की तिथेच रेंगाळतो. त्यालाही बाहेर पडायचे असते. जाता जाता काहीतरी आठवण ..म्हणून हे लेखन.
असो. प्रस्तावना भरपूर झाली. तर निमित्त होते, उपासनेनंतर करण्यात येणारे वाचन. आदरणीय संचालकांच्या 'जिज्ञासापूर्ती' या पुस्तकातील अनुभव पचवणे म्हणजे काय? हा लेख. आगंतुकपणेच माझ्या वाट्याला आला. पण माझी साथ काही सोडेना. मग त्याच्या साथीने जे काही गोळा झाले ते जरा नीट मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
लेखाची सुरुवात ... एखादा विलक्षण अनुभव आपण घेतो. कधी आनंदाचा, कधी आश्चर्याने थक्क होण्याचा, कधी भीतीचा, कधी गोंधळून जाण्याचा, कधी चीड आणणारा, कधी हसायला लावणारा, कधी मंत्रमुग्ध होण्याचा, कधी उत्साहाने ओसंडून जाण्याचा. त्या अनुभवाची आठवण आल्यावर मनामध्ये पुन्हा फक्त आधीची भावना निर्माण झाली तर आपण तो अनुभव पचवलेला नाही.
आणि ही tagline मला माझ्या अनुभवांकडे बघायला घेऊन गेली. कोणते अनुभव असे आहेत की जे मी अजून पचवलेले नाहीयेत? कोणते अनुभव मला पचवावे वाटत नाहीयेत? आणि कोणत्या अनुभवांची मी चवही चाखली नाहीये? कोणते अनुभव मी आवर्जूनघ्यावेत आणि पचवावेत सुद्धा? असे अनेक प्रश्न...
वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक कर्तव्ये करताना, एकट्याने घेतलेले, सोबतीने घेतलेले, नाती जपताना, नाती निर्माण होताना , कार्यामध्ये सक्रिय असताना, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचे हट्ट जिरविण्यासाठी जाणीवपूर्वक, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हतबल होऊन किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करत, स्वतः ला सिद्ध करण्यासाठी...... केवढी ही अनुभवामागची कारण मीमांसा.
सर्वच जण अनुभव समृद्ध आहोत की! कैक उन्हाळे पावसाळे बघून झालेले, कैक उन्हाळे पावसाळे बघत स्वतःला अजूनही चाचपडत असणारे आणि उन्हाळे पावसाळे पण असे काही असतात का हा प्रश्न पडलेले सर्वच जण......या अनुभव समृद्धतेचे धनी ठरतात.
मग आता हे अनुभवांची संख्या जास्त matter करणार आहे की....यातले अनुभव पचवणारे किती आहेत? ही संख्या जास्त matter करणार आहे? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारावा असे वाटते. हा अनुभव माझ्यासाठी काय घेऊन आलेला आहे आणि याकडे मी कसे बघायचे आहे याचे चिंतन प्रकर्षाने नक्की घडावे.
good.... हा विचार नक्की होऊ शकतो की.. अरे त्या अनुभवातून आम्ही सावरलेलो आहोत किंवा आता तो आनंद त्या प्रमाणात व्यक्त होत नाही, त्याची तीव्रता नक्की कमी झालेली आहे. पण पुन्हा तसाच अनुभव आला तर तसेच मला आकाश ठेंगणे होणार आहे का ? किंवा माझ्या पायाखालची जमीन तशीच हलणार आहे का? अशा प्रश्नाची उत्तरे हो असतील तर अजूनही आपण तो अनुभव पचवलेला नाही.
हे अनुभव पचवत पचवतच सिद्धी मिळते का? अनेक गोष्टी समोर आल्या... माझ्या डोक्यावरून आई वडिलांनी हात फिरवला, लेकाने येऊन कडकडून मिठी मारली, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या मिठीत विसावणे, आपल्या कर्तृत्वाकडे विश्वासक नजरा खिळून असणे, यशानंतर मिळणारी कौतुकाची थाप, दिलखुलास गप्पांच्या प्रसंगी खळखळून हसणे हेही आपल्याला येणारे अनुभवच आहेत की.... हेही पचवायचे का? हे पचवायला गेलो तर आयुष्यात निरसता येणार नाही का? हे अनुभव आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. कार्यप्रवण बनवतात. मग हे कसे पचवायचे? अन्न पचवताना जसे पौष्टिक घटक अंगी लागतात आणि बाळसे धरते ना अगदी तसे.... हे अनुभव पचवताना असेच हितकारक घ्यायचे, पण ते मिळाले तरच कार्यप्रवण राहू असा हट्ट धरायचा नाही बहुतेक... हा मी काढलेला अर्थ.
आयुष्य काही सकारात्मक ऊर्जा घेऊनच येत नाही. अनेक नकारात्मकता निर्माण करणारा ही एक गट भेटीस येत असतो. ज्यांचे वलय तुमचे अस्तित्व, कर्तृत्व नाकारत असत, सततचे खच्चीकरण, अपयश, अपेक्षाभंग, परिस्थितीचा घाला याही गोष्टी अनेकदा भेटत असतातच की.. अंगाची लाही लाही करणारे, हृदय पिळवटून टाकणारे, डोक्यात अक्षरश: थैमान घालणारे अनुभव कोणालाही चुकले नाहीयेत. सकारात्मक उर्जेत बाळसे धरायचे असते तर नकारात्मक उर्जेत ताकद पणाला लावायची असते बहुतेक.... स्वतःला किती पेलू शकू? हे आजमवायचे असते बहुतेक... काही अनुभव, प्रसंग इतके कारुण्यमय असतात कि दुष्मनावर पण वेळ येऊ नये असे वाटते. नाहीतर रोज मरे त्याला कोण रडे? असे म्हणत केवळ दिवस रेटणे ही वृत्ती व्हायची. हे जर रेटारेटीचे आयुष्य नको असेल तर आधीचे अशा प्रकारचे अनुभव तावून सुलाखून बाहेर काढणारे ठरले... हेही असेच असतील हा एक विचार आधीचे अनुभव पचवताना आत्मसात करायचा असतो बहुतेक...
अनुभव घेतला की पचला हे गृहीतक चुकीचे. त्याला पचनासाठी आवश्यक असणारा वेळ पूर्णपणे नक्की दिला गेला पाहिजे. ती एक प्रक्रिया असते ज्यामध्ये तुम्ही घडत असतात. तो वेळ न देणे म्हणजे अपेक्षित परिणामांमध्ये interfere करण्यासारखे होईल असे वाटते.
Assimilation... सात्मिकरण.... विज्ञान विषयातील Digestion ची process तत्वज्ञानरुपी फारच प्रभावी ठरत चालली आहे असे वाटले. काही अन्न पदार्थ means अनुभव हे चव घेण्यासाठी देखील तुमच्या समोर येणार नाहीत. पण समोरच्या व्यक्तीच्या ताटात असू शकतात. त्या व्यक्तीशी संवाद साधला तर ही चव चाखावी का? चाखावी लागली तर तुम्ही त्या क्षमतेचे आहात का? किती ताकदी पर्यंत आपल्याला कस लावावा लागेल याची चाचपणी करता यायला हवी....
असो.... पण हे सगळे का करायचे? चालले आहे की ठीक... special लक्ष न देताही अनुभव पचत आहेत. अन्न पचताना कोठे लक्ष द्यावे लागते? करतात च सगळ्या यंत्रणा त्यांचे त्यांचे नीट काम.... हाही मलाच पडलेला प्रश्न....
उत्तरही शोधावे म्हटले... शरीर क्रिया मेंदूच्या नियंत्रण कक्षेत येतात. म्हणून ते आपल्याला त्रासाचे होत नाही.... अनुभवांचे पचन मनासाठी परिणामकारक ठरत असते. त्याला अस्थिरतेचा शाप.... त्याची अस्थिरता शाप बनून द्यायची नसेल तर मेंदूला इथेही लक्ष घालावेच लागणार. कोणी याला practical वृत्ती म्हणेल, कोणी याला सिद्धी म्हणेल किंवा कोणी योगी म्हणेल, किंवा कोणी कशाचीच कदर नसलेला असेही म्हणू शकेल.
पण अनुभव पचवलेलेच कार्य सिद्धीस नेऊ शकतात. उत्तमता गाठू शकतात. आणि remarkable काम करण्यासाठी पाय रोवून उभे राहू शकतात.
लेखाचा शेवट : अनुभव पचवल्यानंतर स्थळ, काळ, प्रसंग आणि त्यातील व्यक्ती बदलल्या तरी आधीच्या अनुभवाचा उपयोग नवीन परिस्थितीला शहाणपणाने सामोरे जाण्यासाठी होतो.
No comments:
Post a Comment