Sunday, 8 March 2020

स्त्रीत्व की मनुष्यत्व ?

Hi….
जागतिक महिला दिनाच्या संध्येला....
भारी वाटतं ना ..आपल्याबद्दल कोणीतरी एवढं भरभरून लिहित आहे. कोणीतरी काय....सगळेचजण  अगदी सगळेचजण ...सगळ्यांच्या status ला स्त्री म्हणजे...मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व! सहनशील, त्यागी, प्रेम, वात्सल्य, झुळूक ....आई, बहीण, प्रेयसी, पत्नी .... एकेक साज चढत जातो. Being woman चे  एक सुंदर वलय निर्माण होऊ लागते. मग being woman की being human हा संघर्ष उगीचच मनात घोळू लागतो. कारण काहीच नाही... पण वाटू लागतं! वाटायला काय तसं काहीही वाटत !
Special treatment, special respect, द्या असं सांगायची गरज का निर्माण झाली असेल? निसर्गाच्या दोनच निर्मिती, कलाकृती  पुरुष आणि स्त्री. जगाच्या पाठीवर कोठेही जा .... पुरुष आणि स्त्री याच रचना बघायला मिळणार... तरिही स्त्रीची रचना, तिचं अस्तित्व जाणून घ्या हे सांगायची, नुसते सांगायची नाही तर त्यासाठी घाट घालण्याची गरज पडावी....टाहो फोडावा लागतो आमच्याकडे बघा.....त्यासाठी कामाची यादी द्यावी लागते आणि एवढेच नाही तर स्त्री पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगावे लागते... ही चढाओढ कशासाठी? एकाला सिद्ध करण्यासाठी दुसरा नेहमी दुसऱ्या स्तरावर का न्यावा लागतो? .... हा मला पडलेला साधा प्रश्न आहे...
मग हळूहळू उत्तर समजू लागते. स्त्रीचं अस्तित्व समजत नाही, लक्षात येत नाही असं नाही. तिचं अस्तित्व तिच्या बौद्धिक आणि मानसिक सामार्थ्यापेक्षा शारीरिक सामर्थ्याला जास्त प्राप्त आहे. नाजूकता, सौंदर्य, लज्जा, लोभस याचं वलय पूर्वापार तिच्या भोवती निर्माण झालेले आहे. सहनशील, त्यागी हे तिचे हातखंडे आहेत. कितीही वेळा आणि कधीही ती हे  करू शकते. ऐतिहासिक समाज या विचारांशी तद्रूप होता. काही कोष, काही विचार हे सोयीच्या राजकारणासारखे असतात. समजत असतं पण आम्हाला ते सोडायचे नसतात. सहज उपलब्ध असलेली  उपभोग्य अशी बाब कोणीही मनुष्य सहज सोडू शकणार नाही. तो एक मानवी स्वभाव आहे. त्यावर  प्रयत्नपूर्वक  काम करावे लागते. सध्या हा घाट प्रयत्नपूर्वक कामाचा आहे.
पण तरिही काही गोष्टी खटकत आहेत. मी स्त्री म्हणून मला ही सवलत हवी किंवा मला सहानुभूती दाखवा असा लेप या प्रयत्नास चढायला नको. सौंदर्य, नाजूकतेचे जे वलय झाले आहे ज्याच्या संरक्षणाची जबाबदारी may be ऐतिहासिक काळात पुरुषांनी उचलली होती आणि सरावाने ती मक्तेदारी झाली असावी. स्त्रीला आज हे पाश तोडायचे आहेत. 
केवळ माझ्यामध्ये हेच गुण नाहीत, तर वीरता, साहस, धैर्यशीलता, निर्णयक्षमता, उत्तरदायित्व, पराक्रम, सारासार विवेक बुद्धी हे गुणपण आहेत. आणि हे गुण केवळ स्वानंद मिळविण्यासाठी नाहीयेत. त्याचे सादरीकरण झाले तर सामाजिक दायित्व सुद्धा मी पेलू शकते.  आता मी या सादरीकरणासाठी सिद्ध होऊ पहात आहे. 
अर्रर..... पण या गुणांचा मालकी हक्क पुन्हा पूर्वापार पुरुषांकडे चालत आलेला. त्यामुळे या गुणांना साज पौरुषार्थाचा.... त्यामुळे हे गुण प्रकट करायचे की पुरुषांशी स्पर्धा हीच भूमिका आम्हाला समजेना.... आणि पुरुषांशी competition सूरू झाली. मग घरातील अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आर्थिक बाजू strong असणं गरजेचं आहे का ..ok ..मग मी आर्थिकदृष्ट्या सबल होणार... पण त्या बरोबरीने माझे वात्सल्यही कमी होता कामा नये....मग मी अस्तित्व आणि कुटुंब प्रेम हा झगडा माझ्याच पातळीवर निर्माण केला. डार्विन चा सिद्धांत मला खूप जवळचा वाटतो.... struggle for exsistence and Survival of fittest! स्त्री सुद्धा या सिद्धांताची शिकार झाली.... किंवा त्या नियमातून तिची सुटका नाही. स्त्रीत्व नाकारून पुरुषार्थ नको आहे तिला.... आणि केवळ स्त्रीत्व असेल तर तिचे  अस्तित्व नेहमी दुसऱ्या स्तरावरच गणले जाईल...किंवा गणना ही होणार नाही आणि ती गणना होण्याआधीच अस्तित्व संपुष्टात आणले जाईल हे दडपण आहे.
मग या सगळ्याचं combo pack मी Superwoman बनणार. स्त्रीत्व आणि पुरुषत्व माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. कधी सहज तर कधी जीवाचा आटापिटा करून... पुरुषार्थाचे वलय असलेले गुण माझ्यामध्ये आले तर आणि तरच माझा आत्मविश्वास प्रबळ ठरणार...नाहीतर माझे अस्तित्व पायदळी तुडवले जाणार... केवढी ही स्पर्धा.... 
आपण स्वरूप, व्याख्या यामध्ये अडकतो का? पुरुषांकडे सहनशक्ती, त्याग, सौंदर्य, वात्सल्य, कारुण्य नसते का? बापाचा जीव तीळतीळ तुटत नाही का? भावाचा हात नसेल तर बहीण पूर्ण होते का? पतीचे कर्तृत्व नसेल तर पत्नी सहज गृहलक्ष्मी होऊ शकते का? प्रियकराची उबदार मिठी नसेल तर स्त्री मधील प्रेयसी खुलू शकते का? स्त्रीत्वच्या प्रकटीकरण करण्यासाठी पुरुषार्थाच्या व्याख्येत अडकलेले हे गुण नाकारता येतील का?
स्त्रीत्व आणि पुरुषार्थ एकत्र आल्याशिवाय नवनिर्मिती होऊ शकत नाही. कोणाही एकाचे वर्चस्व किंवा प्राबल्य निसर्गाने बहाल केलेले नाहीये आणि ते त्याला मान्यही नाहीये. स्त्रीत्व आणि पुरुषार्थ समानता ही  मनुष्यत्व मध्ये विलीन केली जाऊ शकते का? HAPPY HUMAN DAY असू शकतो का? परस्परांना जाणणारा, ऐकणारा, सुनावणारा,  मानणारा, कदर करणारा, पूजन करणारा, असा सर्व गुणांनी परिपूर्ण असा पूरक गट निर्माण होऊ शकतो का? घरामधील, समाजामधील त्या व्यक्तीच्या भूमिकेला तिच्या स्त्री पुरुष असण्याच्या अपरोक्ष न्याय मिळू शकतो का? त्या व्यक्तीचा रोल profile लिंग निरपेक्ष असेल का? 
मनुष्यानुसार त्या गुणांचे प्राबल्य कमी अधिक असेल आणि ते असावे. तर आणि तरच पूरक गुणांची खाण असणाऱ्या व्यक्तीशी अद्वैत घडू शकते. 
हे अद्वैत घडता क्षणीच वर्चस्वाचे, सिद्ध करण्याचे, कपटाचे, छळाचे, अवहेलनेचे   सगळे खेळ संपुष्टात येतात.... आणि राहतो तो फक्त संवाद.... आत्म्याचा आत्म्याशी .... बुद्धिमान, सौंदर्यवान, भावनासंपन्न  मनुष्यत्वाचा ....
अशा संवादाची  वाट पहात आहे!

8 comments:

  1. खुपच छान ताई

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. सुंदर मांडणी ताई , गेल्या अनेक शतकापासून या विषयावर लिहिलं जातंय आणि काळानुसार प्रत्येक पिढीत बदल होत आहे तच. व्यक्तीला नि कुटुंबाला नियंत्रित ठेवण्यासाठी मुख्य भूमिका स्री निभावत आली आहे. इतिहासात आणि सद्य काळात अनेक उदाहरण आहेत. बदल आणि सुधारणा कुठल्याही बाबतीत हे भारतीय संस्कृती जपूनच असावेत. माझे मत.

    ReplyDelete
  4. छान लिहिलंय स्मिता...

    ReplyDelete
  5. Exactly...this thought process should be followed...instead of comparing ourselves with men.
    Apple to Orange comparison can't prove anything... infact comparison should completely be eliminated as every human being is unique...

    Human's Day..great thought

    Keep it up Smita...

    ReplyDelete
  6. Well narrated..Smita. following the same.

    ReplyDelete
  7. इतके प्रगल्भ विचार समर्पक शब्दात मांडलेस!!!
    खूप कौतुकास्पद!!!!
    लिहिती रहा!!!!!!!
    👍👌💐😊

    ReplyDelete
  8. Smita , khup chaan .vachun Daha lokana jari yatun kahi shikata aale, tar te khare celebration. Gender specific celebration is not expected ,just try to give respect as human being is required .

    ReplyDelete